Last Updated on 11 Mar 2024 7:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आष्टा महाविद्यालयात इनोव्हेशन अँड इंक्यूबेशनवर परिसंवाद
सांगली । आष्टा येथील कासेगाव शिक्षण संस्थेचे, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आष्टा येथे वाणिज्य नियोजन मंडळाच्या वतीने ‘ऍक्टिव्हिटीज फॉर इनोवेशन अँड इंन्क्युबेशन’ या विषयावर एक दिवसीय परिसंवाद संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे संतोष रास्कर व प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांच्या हस्ते झाले.
कार्यशाळेसाठी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक संतोष रास्कर यांनी ‘सध्याच्या घडीला तुमच्याकडे नाविन्य असेल तरच त्याला मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण होते’ असे प्रतिपादन केले.इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्याने अधिक प्रगती केली कारण त्याच्या अंगी बुद्धीचा वापर करून नावीन्याचा विचार करण्याची क्षमता असते.आजपर्यंत मानवाच्या अंग मेहनतीच्या अनेक कामांना पर्याय उपलब्ध होते पण मनुष्याच्या विचार करण्याच्या बौद्धिक क्षमतेला पर्याय उपलब्ध नव्हता तरीही आज ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ च्या माध्यमातून या बौद्धिक क्षमतेला देखील आव्हान देणारे पर्याय उपलब्ध होताना दिसत आहेत. या पर्यायांची उपलब्धी ही देखील नाविन्याच्या ध्यासामुळेच शक्य झाले. म्हणजेच ‘नाविन्याचा विचार’ करण्याच्या क्षमतेला मात्र अजूनही पर्याय उपलब्ध झाले नाही असेच म्हणता येईल. तुमच्या नावीन्याचा एक निर्णायक विचार हा तुमच्या भविष्यकालीन अनेक पिढ्यांचे भले करू शकतो. शिकण्याचा अर्थ म्हणजे केवळ माहिती करून घेणे असे नाही, तर त्या माहितीचा, ज्ञानाचा आपल्या व्यवहारात वापर कुशलतेने करण्यासाठी नावीन्याचा अवलंब होणे आवश्यक असते.” असे सांगून मा. संतोष रास्कर यांनी ‘उद्योग व्यवसायामध्ये नाविन्याची अधिक जोड द्या’ असे सांगितले.
प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर म्हणाले,’डोक्यात आलेली कल्पना प्रत्यक्षात उतरवून त्याची अंमलबजावणी करण्याचे धाडस सर्वांनी केले पाहिजे.जुन्या रूढीपूर्ण विचार पद्धती बाजूला सारून सर्जनशील विचारांची कास धरा.प्रतिकूल परिस्थितीत देखील जो पाय रोवून उभा राहतो त्याचीच नोंद इतिहासात घेतली जाते’ असे सांगून विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून नाविन्याच्या शोधासाठी तत्पर रहा असे आवाहान केले.
सूत्रसंचालन प्रा. डॉ.मेघा माळी यांनी केले, स्वागत व प्रास्ताविक प्रा. राजेंद्र प्रधान यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. अभिजीत देसावळे यांनी मानले.
याप्रसंगी महाविद्यालयतील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. पौर्णिमा चव्हाण, प्रा.डॉ. शीला पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












































































