Last Updated on 30 Sep 2024 1:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री उपस्थित होते.
यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आला आहे. शासन आदेशात यासंदर्भातली सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
शासन निर्णय असा : प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना “कामधेनू” असे संबोधण्यात येते. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जार्तीच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ.) तथापि, दिवसेंदिवस देशी गायीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
हेही वाचा – कापूस – सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू…
देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मुल्य आहे. देशी गार्याच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पुर्ण अन्न आहे. देशी गाईच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्व विचारात घेता, देशी गार्टीच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे.
ही पार्श्वभुमी विचारात घेवून, पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायीस “राज्यमाता- गोमाता घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायीच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून देशी गायींना यापुढे राज्यमाता- गोमाता म्हणून घोषीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.












































































