Last Updated on 14 Sep 2023 10:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । “शास्त्राच्या कसोटीवर न टिकणाऱ्या ज्योतिषाच्या कुंडलीला नकार देत तिला पर्याय म्हणून वैज्ञानिक व मानवी गुणांची आधुनिक कुंडली स्वीकारावी.हुंडा देणे किंवा घेणे आणि जन्मपत्रिका पाहणे या बाबींना स्पष्टपणे नकार देऊन साधेपणाने लग्न करण्याचा आग्रह केला पाहिजे.”असे प्रतिपादन कृष्णात कोरे यांनी केले.
इस्लामपूर येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयातील विवेक प्रबोधिनी,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत ‘वैज्ञानिक जाणिवा’ एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.ते पुढे म्हणाले,”जोडीदाराची निवड करताना बाह्य गुणांपेक्षा बौद्धिक, भावनिक आणि मूल्यात्मक अनुरूपता पाहणे महत्त्वाचे असते.
प्रेम आणि आकर्षण यांतील फरक समजून घेणे गरजेचे आहे.हुंडा,पत्रिका आणि व्यसनांना नकार देऊन लग्न साधेपणाने किमान कर्ज न काढता करणे आणि आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाची शक्यता पडताळून पहावे.लग्न ठरवण्यापूर्वी मुलगा आणि मुलगी या दोघांचीही आरोग्य तपासणी करण्याची आवश्यकता असते.
अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ.अंकुश बेलवटकर म्हणाले,”दुष्ट व वाईट प्रथा परंपरा व्यक्तीचे शोषण करतात.देवांची निर्मिती मानवानेच केली आहे.धर्म ही खाजगी बाब आहे.अति धार्मिकतेमुळे तर्क व वेग बुद्धी संकुचित होते.आपली मन व बुद्धी विवेकी व वैज्ञानिक दृष्टिकोनाची करा. या कार्यशाळेत मिळालेल्या ज्ञानाचा प्रसार आपल्या घरात, गावात समाजात करा”.
अंनिसचा देव व धर्माला विरोध नाही,परंतु कोणी देव व धर्माच्या नावावर फसवणूक करत असेल तर विरोध

कार्यशाळेच्या प्रथम सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शन करताना संजय बनसोडे म्हणाले,”अंधश्रद्धा निर्मूलन समिती देव व धर्माला विरोध करत नाही,परंतु कोणी देव व धर्माच्या नावावर फसवणूक करत असेल तर समिती विरोध करते.तरुणांनी नेहमी व्यवस्थेला प्रश्न विचारावेत.शंका घ्यावी प्रश्न विचारण्यातूनच वैज्ञानिक दृष्टी रुजते.जेवढा पुरावा तेवढा विश्वास वैज्ञानिक दृष्टिकोनातून जीवन आनंदी व सुकर होते.गप्प न राहता समाजातील चुकीच्या अपप्रवृत्तीवर बोट ठेवायला शिका.आपल्या श्रद्धा बरोबर आहेत की चुकीच्या आहेत याची चिकित्सा करा.अंधश्रद्धेला जास्तीत जास्त महिलाच बळी पडतात.बुवा-बाबांनी केलेल्या चमत्काराची चिकित्सा करा.महिलांनी वडाच्या वृक्षासोबतच पर्यावरण संवर्धनाचाही आग्रह धरावा. वृक्ष लागवड करावी.त्यांनी वृत्तवैकल्यांची चिकित्सा केली पाहिजे.विश्वगुरू ही संकल्पना फसवी व तकलादू आहे.जगातील सर्व धर्म प्रेम व माणुसकी शिकवितात. सर्वच धर्म अहिंसा आणि सर्वधर्मसमभावाचा आग्रह धरतात.”
कार्यशाळेच्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक करताना प्रा. डॉ.राम घुले म्हणाले,”आजच्या विज्ञान युगात आपल्या समाजात लहानपणापासूनच भूत, आत्मा,राक्षस व देवदेवस्कीची भीती घातली जाते.ज्योतिष्य,पंचांग,अंगारे,धुपारे शकुन-अपशकुन,काळ्या बाहुल्या,लिंबू मिरची,गंडेदोरे,ताईत यांचा मारा भाबड्या-अज्ञ समाजावर केला जातो.त्यामुळे ते शोषणाचे बळी ठरत आहेत.त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा लोप होऊन लोक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. लोकांनी श्रद्धा व अंधश्रद्धा डोळसपणे तपासून पाहाव्यात.आजची तरुण पिढी मोबाईलवर सर्रासपणे देवांचा स्टेटस ठेवताना दिसते.आत्यंतिक देवभोळेपणा हा ‘स्किझोफ्रेनिया’ या मनोविकाराचे लक्षण असते.अतिंद्रीय,अद्भुत शक्ती किंवा दैवी शक्ती आपल्या सदैव मदत करीत असतात अशी त्यांची धारणा असते. स्टेटस ही तालबद्ध चेतना असते. त्यातून अवस्तूभ्रम निर्माण होतात. तरुणांनी विवेकवादी बनावे.”
कार्यशाळेचे समन्वयक प्रा. के. बी. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.ते म्हणाले,”आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री आणि नदीला पावित्र्याचे स्थान दिले जाते परंतु वास्तवात मात्र स्त्रियांच्यावर अत्याचार वाढले आहेत.नदी प्रदूषित केली जात आहे.” याप्रसंगी प्रबोधनाची गीते सादर करण्यात आली.सभासद नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले.याप्रसंगी प्राध्यापक संदीप पाटील व सुनील बागुल हजर होते.कार्यशाळेत एकूण 55 विद्यार्थिनी हजर होत्या.












































































