Last Updated on 23 Sep 2025 9:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | नवरात्रोत्सवामध्ये श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वाहन पार्किंगच्या समस्येमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील पहिला ‘स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम’ (Smart Parking Management System) हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर शहरात सुरू करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या कोल्हापूरमध्ये, विशेषतः नवरात्रौत्सवातील भाविक आणि पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने अत्याधुनिक ‘स्मार्ट पार्किंग’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. हे महत्त्वाकांक्षी उपक्रम वाहतूक कोंडी कमी करेल, यामुळे पर्यटकांना सुलभ आणि सुखद अनुभव घेता येईल, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
हा उपक्रम राज्यातील इतर पर्यटनस्थळांवरही राबवण्याची योजना आहे. या प्रणालीचे उद्दिष्ट शहराच्या मध्यवर्ती भागातील पार्किंगची जागा सहज उपलब्ध करून देणे आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन अधिक सुटसुटीत करणे आहे. मोबाईल ॲपवर आधारित या प्रणालीमुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिक त्यांना सोयीस्कर पार्किंगची जागा शोधू शकतील आणि त्या जागेचे बुकिंग करू शकतील, असेही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये :
- ऑनलाईन बुकिंग : पर्यटक मोबाईल ॲपद्वारे किंवा दिलेल्या क्यूआर कोडद्वारे पार्किंगची जागा आधीच बुक करू शकतील.
- रिअल-टाइम अपडेट्स : उपलब्ध पार्किंगच्या जागांची माहिती रिअल-टाइममध्ये अपडेट होत राहील.
- वाहतूक कोंडीत घट : प्रणालीमुळे वाहनचालकांना पार्किंगसाठी जागा शोधण्यात वेळ घालवावा लागणार नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल.
- सुरक्षितता : या प्रणालीमुळे पार्किंग व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होईल.

QR कोड आणि ऑनलाइन माहितीः शहरातील ठिकठिकाणी पार्किंगच्या जागेचे QR कोड लावण्यात येतील हा QR कोड स्कॅन करुन भाविक शहरात नियुक्त केलेल पार्किंगचे ठिकाण शोधू शकतील.
तसेच भाविक https://parking.mahabooking.com या वेबसाइटवर जाऊन पार्किंगची माहिती मिळवू शकतील.
पार्किंग स्थळांची उपलब्धता : या वेबसाइटच्या होम पेजवर पार्किंगच्या जागेची यादी, गुगल मॅपची लिंक, उपलब्ध जागा (Availability) आणि वाहनांचा प्रकार (Vehicle Type) याची माहिती उपलब्ध असेल. यामुळे भाविकांना त्यांच्या जवळची सोयीस्कर पार्किंगची जागा सहज शोधता येईल.
वाहन प्रवेश (Check-in) : पार्किंगच्या ठिकाणी पोहोचल्यावर स्वयंसेवक (Volunteer) वाहनांच्या नोंदी करतील. यामध्ये वाहन मालकाचे नाव, मोबाईल नंबर (WhatsApp), आणि वाहनाचा फोटो घेतला जाईल. ही माहिती भरल्यानंतर लगेचच वाहन मालकाला त्याच्या WhatsApp नंबरवर एक पार्किंग पास (Parking Pass) मिळेल. या पासमध्ये पार्किंगमध्ये प्रवेशाची वेळ (In-Time), सर्व नोंद केलेली माहिती आणि एक युनिक QR कोड असेल.
रिअल-टाइम अपडेट : प्रत्येक वाहन पार्किंगमध्ये आत आल्यावर किंवा बाहेर गेल्यावर पार्किंगमधील उपलब्ध जागांची संख्या आपोआप (Automatically) अपडेट होईल. यामुळे पार्किंगची अचूक स्थिती कळेल.
वाहन बाहेर काढणे (Check-out): वाहन बाहेर काढताना स्वयंसेवक पार्किंग पासवरील QR कोड स्कॅन करतील. त्यानंतर वाहन मालकाला त्याच्या WhatsApp वर पार्किंग चार्जची स्लिप (Parking Charge Slip) मिळेल.
सुरक्षा आणि सुलभ व्यवस्थापन : या स्मार्ट प्रणालीमुळे प्रशासनाला वाहनांचा मागोवा घेणे आणि पार्किंग व्यवस्था सुरळीत चालवणे सोपे जाईल. यामुळे भाविकांना त्रास होणार नाही आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होईल.








































































