Last Updated on 15 Nov 2024 10:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । गेल्या २० वर्षापूर्वी पेठ-सांगली रस्ता व रिंगरोड झाले असते तर इस्लामपूर शहराच्या व्यापार वाढीला चालना मिळाली असती. कोल्हापूर शहरापेक्षाही हे शहर विकसित झाले असते. परंतु शहराच्या विकासाला खीळ घालण्याचे काम विरोधकांनी केलं आहे. त्यामुळे गेली ३५ वर्षे इस्लामपूर विधानसभा मतदार संघाला बारामतीसारख्या विकास कामांचे गाजर दाखवणाऱ्या कर्तृत्वहीन विरोधकांना या निवडणुकीत परिवर्तन घडवून त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
इस्लामपूर शहरातील रामभाऊ शेवाळे घर, शिदे सरकार घर, घरकुल, कुंभार गल्ली, उरुणवाडी येथे प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. यावेळी गौरव नायकवडी, केदार पाटील, विक्रम पाटील, कपिल ओसवाल,अमित ओसवाल, अशोक खोत, अजित पाटील, अक्षय पाटील, सनी खराडे, सुजित थोरात, आशा पवार, सुनीता काळे, स्मिता पवार, ज्ञानेश्वरी देशपांडे, प्रवीण परीट, अक्षय कोळेकर प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, विरोधक म्हणतात माझ्या विरोधात उभा राहिलेला माणूस पुढल्या वर्षी माझ्या विरोधात उभा राहत नाही. परंतु मी त्यांना सांगेन या संभूआप्पांच्या पंढरीत अहंकार व आहमपणा चालत नाही. जनताच आता त्यांचा आहमपणा दूर करेल. विरोधकांनी कधी ५० रुपये बहिणींना ओवाळणी टाकली नाही. पण महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणून महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाउल उचलले. परंतु तेच विरोधक आज ही योजना बंद पाडायला कोर्टात गेले. ३५ वर्षात शहराला काय मिळाले तर महिला मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर जाणारे नगरसेवक व घंटा गाडीतून दारू वाहतूक करणारे नगरसेवक, मग शहराचा कसा विकास होईल. तुम्ही ज्याला निवडून देता ते लोकप्रतिनिधी कोरोना संकटात कुठे होते, मोक्याचे भूखंड कोणी गिळले, एवढे वर्षे शहरातील अंतर्गत रस्ते का झाले नाही, हा जाब विचारायची ही वेळ तुमच्यावर आली आहे. इस्लामपूर एमआयडीसीमध्ये नवीन कंपन्या त्यांना आणता आल्या नाहीत. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता आला नाही. आज तरुणांना कागल व पलूसकडे रोजगारासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. भुयारी गटारीला कोणी विरोध केला, हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे विरोधकांना परिवर्तन करून धडा शिकवा.
विक्रम पाटील म्हणाले, इस्लामपूर नगरपालिका पालिका निवडणुकीत परिवर्तन घडवून तुम्ही आम्हाला इस्लामपूरची सूत्रे आमच्या हातात दिली. २० वर्षात झाला न्हवता तो विकास आम्ही गेल्या पाच वर्षात करून इस्लामपूर शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकला. आता निशिकांतदादांना या निवडणुकीत मताधिक्य देऊन इस्लामपूर शहराच्या विकासाला चालना द्या.
दरम्यान, ओबीसी महासंघार्फे निशिकांतदादांना पाठींबा देण्यात आला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमीपुत्राला साथ द्या…
इस्लामपूर शहरातील भूमीपुत्राला आजपर्यंत विधानसभेत शहराचे प्रश्न मांडण्याची संधी मिळालेली नाही. १९७८ ला स्व.एम.डी.पवार यांनी इस्लामपूरकरांच्या विचाराचा माणूस उभा करून त्यांना १० हजार मतांचे मताधिक्य दिले होते. आता तीच वेळ येथील जनतेवर आली आहे. कासेगावच्या माणसाला आजपर्यंत निवडून देऊन तुम्हाला काय मिळाले. आपलं आणि परखे ओळखा. आता तुम्हाला तुमचा घरचा आमदार करायची संधी मिळली आहे. त्यामुळे आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन घडवण्यासाठी भूमीपुत्राला साथ द्या, असे आवाहन ही निशिकांत भोसले-पाटील यांनी यावेळी केले.












































































