Last Updated on 08 Oct 2022 6:14 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । सामाजिक बांधिलकी म्हणून विविध घटकांना एसटीच्या २१ सवलती दिल्या जातात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलत देणारा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे, सरकारच्या या निर्णयामुळे आतापर्यंत सुमारे 54 लाख 58 हजारांहून अधिक ज्येष्ठ प्रवाशांनी लाभ घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाचे कौतुक केले.
75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास,तर 65 ते 75 वर्षादरम्यानच्या नागरिकांना सर्व सेवांमधून 50 टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल,अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती.25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ झाला होता.26 ऑगस्ट पासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती.एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृतज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.
दररोज 1 लाख 75 हजार जणांना लाभ
आतापर्यंत राज्यभरातून सुमारे 54 लाख 58 हजारांहून अधिक म्हणजे दररोज सरासरी 1 लाख 75 हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. या मोफत प्रवासात आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे.












































































