Last Updated on 23 Jun 2025 7:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘एसटी’चा तोटा १० हजार कोटींवर…
दरवर्षी 5 हजार नवीन बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार
मुंबई । महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग महामंडळाची आर्थिक सद्यस्थिती दर्शवणारी श्वेतपत्रिका आज जाहीर झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीचे एकूण महसुली उत्पन्न, खर्च, कर्ज, आणि देयके किती आहेत? याबाबतचा आढावा घेणारी श्वेतपत्रिका मांडली आहे. या श्वेतपत्रिकेत ४५ वर्षाचे अवलोकन करण्यात आले आहे. या ४५ वर्षांपैकी फक्त ८ वर्षेच महामंडळाला काही प्रमाणात नफा झाला आहे. उर्वरित सर्व वर्षात मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याचं समोर आले आहे.
यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर तसेच सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.
गेल्या ४५ वर्षांमध्ये केवळ ८ वर्ष एसटी महामंडळ चालनिय नफ्यात होते. राज्यातील तब्बल ९० टक्के लोकसंख्येला थेट परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची ” लोकवाहिनी ” आहे. दररोज सुमारे ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित दळणवळण सेवा देणारी एसटी भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे, हि काळाची गरज आहे.

सन २०१८-१९ मध्ये एसटीचा संचित तोटा सुमारे ४६०० कोटी होता. परंतु, करोना महामारीच्या काळात टाळेबंदी मुळे व नंतर चालेल्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे तो संचित तोटा आता १०३२२ कोटी पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची देणे सुमारे ३००० कोटी पर्यंत आहेत. अर्थात, यासाठी शासनाने अनुदान स्वरूपात एस टी महामंडळाला मदत करणे अत्यंत आवश्यक असून एसटीची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी मंत्री म्हणून मी शासन दरबारी निश्चितच यासाठी पाठपुरावा करेन अशी ग्वाही यावेळी प्रताप सरनाईक यांनी दिली.
तथापि, एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील संस्थेचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी आपल्या कामाची उत्पादकता वाढवणे आणि योग्य ठिकाणी काटकसर करून बचत करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.
“दरवर्षी पाच हजार बसेस एसटी महामंडळाच्या ताब्यात आल्या तर आपल्याला उत्पन्न वाढवता येईल असा प्रस्ताव मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मांडला होता. त्याला मंजुरी दिली आहे. हे काही अवघड काम नाही, शेवटी सामान्यांचा एसटीवर विश्वास आहे लालपरीवर प्रेम आहे. एसटी महामंडळाची सद्याची वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडली आहे. आमच्या कार्यकाळात एसटी महामंडळ पुढे नेण्याचा प्रयत्न होईल,” असं प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
एस.टी. तेथे एसटी
डोंगरदऱ्यात व दुर्गम भागात राहणाऱ्या आमच्या आदिवासी बांधवांसाठी (शेड्युल ट्राईब एस.टी.) लवकरच थेट एसटी सेवा सुरू करण्याचा आम्ही संकल्प सोडला असून जिथे केवळ रस्ता अरुंद असल्यामुळे आमच्या ११ मीटर व १२ मीटर च्या मोठ्या बसेस पोहोचू शकत नाहीत. तिथं खास ५० मिनी बसेस आम्ही घेणार आहोत. या मिनी बसेस चालवणे एसटीच्या दृष्टीने तोट्याचे असले तरी आदिवासी बांधवांसाठी तो तोटा सहन करून आम्ही त्यांना प्रवासी सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.












































































