Last Updated on 28 Sep 2024 3:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी; दिवाळीपूर्वी पाचशे रुपये न दिल्यास आंदोलन
सातारा । साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तोडलेल्या उसाला पाचशे रुपये दर द्यावा. तसेच चालू वर्षीच्या हंगामासाठी चार हजार रुपये पहिली उचल द्यावी; अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने कार्वे (ता. कराड) येथे शुक्रवारी शेतकरी मेळाव्याचे केले होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील,जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, युवा अध्यक्ष गणेश शेवाळे, उत्तमराव खवाले, सुनील कोळी, उत्तमराव जगताप, दिगंबर जाधव, आबा शेवाळे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी निवडीही करण्यात आल्या. विश्वासराव जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी तर आनंदराव थोरात यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पंजाबराव पाटील व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पंजाबराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळवून देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना राज्यभर काम करीत आहे. सध्या साखरेला दर चांगले मिळत आहेत. त्यातच उसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत उसाला दर मिळत नाही. त्यामुळे साखर कारखानदारांनी यंदा गाळपास जाणाऱ्या उसाला पहिला हप्ता चार हजार रुपये देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवाळीत पैशांची गरज असते. अनेक साखर कारखान्यांनी अजूनही एफआरपी दिलेली नाही.कारखान्यांनी शेतकऱ्यांची गरज विचारात घेऊन मागील वर्षी गाळपास गेलेल्या उसाला दुसरा हप्ता पाचशे रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, दिवाळी सणाला पाचशे रुपयांचे बिल जर नाही मिळाले, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.’
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विश्वासराव जाधव म्हणाले.












































































