Last Updated on 24 Oct 2025 7:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
५० वर्षापासून प्रलंबित असलेले मागणी ४ महिन्यात झाली पूर्ण
लवकरच इस्लामपूर नगरपरिषदेचे “उरूण ईश्वरपूर नगरपरिषद” असे नामकरण होणार
सांगली । सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामांतर करण्यास केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरिकांची मागणी पूर्ण झाली आहे.
माजी राज्यमंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्याचप्रमाणे २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात आमदार सदाभाऊ खोत यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करून राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. सदर विषयासंदर्भात आमदार सदाभाऊ खोत यांच्या पत्राच्या अनुषंगाने इस्लामपूरचे ईश्वरपूर आणि इस्लामपूर नगरपरिषदेचे “उरूण ईश्वरपूर” असा नामांतरणाबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सांगली जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
त्या पाठपुराव्याला यश मिळत राज्य शासनाने ‘इस्लामपूरचे ईश्वरपूर’ असे नामांतर करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे केली होती आणि आता केंद्र शासनाने त्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
आता पुढील टप्प्यात इस्लामपूर नगरपरिषदेचे नामकरणही “उरूण ईश्वरपूर नगरपरिषद” असे करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
इस्लामपूरचे ईश्वरपुर नामकरण झाल्याबद्दल आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देत आभार मानले आहेत. त्याचबरोबर केंद्र शासनाचे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे देखील आभार मानले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते.













































































