Last Updated on 18 Mar 2022 10:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आचारसंहिता म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. चला तर मग जाणून घेऊयात.
‘आचारसंहिता’ म्हणजे नेमके काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आचारसंहिता 1950 या वर्षी अंमलात आल्यानंतर आदर्श निवडणूक आचारसंहितेचाही स्वीकार करण्यात आला. यामध्ये निवडणूका जाहिर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये, असे नियम त्यांना घालून देण्यात आले. हे Do’s And Dont’s म्हणजेच निवडणूक ‘आचारसंहिता’ होय.
निवडणूक कधी घ्यायची याची तारीख ठरवण्याचे पूर्ण हक्क निवडणूक आयोगाकडे असतात. साधारणतः मतदानाच्या तारखेच्या 21 दिवस आगोदर आचारसंहिता लागू होते. तसंच निवडणूकीची घोषणा होताच आचारसंहिता लागूही करण्यात येते.
एकदा आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाला उमेदवार याचं पालन करतात की नाही याकडे लक्ष देण्याचा संपूर्ण अधिकार असतो. तसंच उमेदवार चुकीचं वर्तन करत असल्यास अथवा नियम मोडत असल्यास संबंधित उमेदवाराला निवडणुकीतून बेदखल करण्याचाही हक्क आयोगाकडे आहे. त्यामुळं प्रत्येक पक्ष या प्रचार काळात आपल्या सूचनांचं पालन करत असतो आणि ते त्याला बंधनकारकही आहे.
निवडणूक आचारसंहिता निवडणूक आयोगाने लागू केलेले काही ठराविक नियम असतात. जे प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाळावेच लागतात. निवडणुकीच्या काळात लागू केलेले निर्देश आणि नियमांना आचारसंहिता असे म्हटले जाते. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू केली जात असते. सरकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतात. ते आयोगासोबत राहून त्यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करतात.
नियमावली
- भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे.
- मतदारांना पैसे वाटणे, महागड्या भेटवस्तू देणे, मतदारांना आमिष दाखवणे, विकासकामाची घोषणा करणे. तसंच योजनांची अमंलबजावणी करणे आचारसंहितेच्या कालावधीत मनाई.
- आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने, विमाने आणि हेलिकॉप्टरचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. तसंच सरकारी मालमत्ता, सरकारी गेस्ट हाऊसमध्ये हक्कही गाजवता येत नाही.
- समाजात जाती, धर्म, वंश, भाषा याआधारे फूट पडेल किंवा वाद निर्माण होतील असं कोणतंही भाषण, प्रचार, घोषणा किंवा आश्वासनं उमेदवार आणि पक्षाने देण्यास मनाई असते. तसेच कोणताही प्रचार रात्री दहा वाजताच्या आतच संपवणं बंधनकारक.
- बैठका किंवा रॅली घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक असतं.
- एखाद्या सभेत विरोधकांचा पुतळा जाळणं, हेही नियमात बसत नाही.
- आचारसंहितेच्या काळात मंत्र्यांना किंवा सरकारला नव्या घोषणा करता येत नाहीत. त्यासाठी निधी जाहीर करता येत नाहीत.
- कुठल्याही पक्षाला प्रतिस्पर्धी पक्षाच्या भाषणात, रॅलीत, प्रचारसभेत, मिरवणुकीत कुठल्याही प्रकारचा अडथळा आणण्यास मज्जाव आहे. त्या उमेदवाराची उमेदवारी निवडणूक आयोगाकडून रद्द होऊ शकते.
- नागरिकांच्या खाजगी मालमत्तेचा किंवा जमिनीचा विनापरवाना वापर कोणत्याही पक्षाला करता येत नाही.
- मतदान केंद्रात कर्मचारी, अधिकारी आणि मतदारांव्यतिरिक्त कुणालाच जाण्याची परवानगी नसते.
- मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरापर्यंत कार्यकर्ते आपल्या पक्षाचा प्रचार करू शकत नाहीत.
- शेवटच्या ४८ तासांदरम्यान प्रचारावर प्रतिबंध- निवडणूक संपण्याची वेळ निश्चित झाल्यापासून त्याआधीच्या ४८ तासांच्या दरम्यान कोणत्याही मार्गाने व कोणत्याही प्रकारे निवडणुकीविषयी कार्यवाही करण्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१, कलम १२५ अंतर्गत प्रतिबंध करण्यात आला आहे.
- जर एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केला तर त्याची तक्रार निवडणूक आयोगाला नियुक्त केलेल्या निरीक्षकाकडे करता येते.












































































