Last Updated on 07 Jun 2023 6:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शहरातील परिस्थिती नियंत्रणात,शांतता राखण्याचे प्रशासनाचे आवाहन
कोल्हापूर | सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर कोल्हापुरात मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील मुख्य चौकात दोन गटात राडा झाल्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी आज घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे.दरम्यान,जिल्ह्यातील इंटरनेट सेवा दिनांक 7 जून 2023 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते दिनांक 8 जून 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 31 तासांच्या कालावधीकरिता खंडीत करण्याचे आदेश गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी पारित केले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
कोल्हापूर शहरात एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून लोक सुरक्षेसाठी दूरसंचार सेवा (इंटरनेट) तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्याबाबतचे नियम, 2017 अन्वये जिल्ह्यातील इंटरनेट सेवा दिनांक 7 जून 2023 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते दिनांक 8 जून 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 31 तासांच्या कालावधीकरिता खंडीत करण्याचे आदेश गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी पारित केले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या कारणावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन धर्मात तेढ निर्माण झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर असामाजिक घटक समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण वा चित्रफित भ्रमणध्वनीच्या माध्यमातून किंवा सामाजिक माध्यमे (Social Media) याद्वारे प्रसारित करुन जिल्ह्यात सामाजिक अस्थिरता तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा आदेश पारित करण्यात आला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.
शहरातील परिस्थिती नियंत्रणात:शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे -जिल्हाधिकारी राहुल रेखावार
प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही
कोल्हापूर शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी निश्चिंत रहावे. नागरिकांनी सोशल मिडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन कोल्हापूर शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेची पाहणी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली. या पाहणी नंतर कोल्हापूरांना आवाहन करताना ते म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच सर्वधर्मसमभावाचा आणि प्रगतशील जिल्हा राहिला आहे. शाहू महाराजांचे कार्य कर्तृत्व आणि त्यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेवून आजवर कोल्हापूर जिल्ह्याने जगाला पुरोगामी आणि आधुनिकतेचा विचार दिला आहे. जगाला आदर्श विचार देणारा हा संपूर्ण जिल्हा आहे. कोल्हापूरचा सामाजिक क्षेत्रातील ठसा कायम राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन करुन प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी श्री. रेखावार यांनी आदेशित केले आहे.
सोशल मीडियावरील अफवांना नागरिकांनी बळी पडू नये – विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आवाहन
सोशल मिडियावरील अफवांना नागरिकांनी बळी पडू नये किंव अनावश्यक घराबाहेर पडून गर्दीत भर घालू नये, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे.सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व भागात जे दंगेवाईक आहेत, जे परिस्थितीचा फायदा घेवून लोकांना घाबरवत आहेत अशा गुंडांना डिक्टेक्ट करण्यात आले असून त्यांना अटक करण्याची कारवाई सुरु राहणार आहे. जे नुकसान घडले आहे त्याची दखल घेवून गुन्हा दाखल करण्यात येईल.सध्या स्थानिक प्रशासनाकडून जे प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत त्याचे पालन करावे आणि कोणतीही अडचण असेल तर स्थानिक पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आपण संपर्क करावा. पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना संरक्षण देण्यास पूर्णतः कटिबंध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
नागरिकांनी भयमुक्त रहावे; पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी – जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे आवाहन
कोल्हापूर शहरात सध्या शांतता असून ती कायम राहील व परिस्थिती चिघळणार नाही, याची पोलीस प्रशासनाच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे. नागरिकांनी भयमुक्त रहावे, प्रशासन आपल्या पाठीशी आहे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.कोल्हापूर पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी शहरात उपस्थित असून जिल्ह्यातील परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन सकाळपासूनच संपूर्ण शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून एसआरपीएफची अतिरिक्त तुकडी मागवण्यात आली आहे. सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सर्व महत्त्वाची ठिकाणे, संपूर्ण शहरातून जमावाला पांगवण्यात आले आहे. त्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे व पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हुल्लडबाजी आणि दगडफेक केलेल्यांना शोधून ताब्यात घेणे आणि पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया सुरु असतानाच शहरात देखील शांतता राखली जाईल, याची देखील दक्षता घेण्यात येत आहे.
जिल्ह्यात 19 जून पर्यंत बंदी आदेश लागू
कोल्हापूर जिल्ह्यात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या कारणावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन धर्माच्या मध्ये तेढ निर्माण झालेली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एखादे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवनू तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिनांक 19 जून रोजी रात्री 8 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केला आहे.कलम 37 (1) -शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा इतर शस्त्रात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन. जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे,हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे.कलम 37 (3)- जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमणेस, मिरवणुका काढणे व सभा घेणे.हा हुकुम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तत्ये व अधिकार बजाविणे संदर्भात उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधिक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पेालीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादींना लागू पडणार नाही.
हा आदेश दिनांक 19 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहील.
Post Views: 372