Last Updated on 02 Mar 2025 7:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून विरोधी पक्षाच्या लोकांना खोट्या गुन्ह्यात सरकार अडकवत असल्याचा आरोप करत आज विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. सत्ताधारी, विरोधकांना सापत्न वागणूक देत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद नाही, हे मुख्यमंत्री मान्य करतात. मात्र, सरकारकडून संसदीय लोकशाहीचं पालन केलं जात नाही. केवळ चहापानाला बोलावुन संवाद होत नसतो असं विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं. उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
राज्याच्या कृषीमंत्र्यांना शिक्षा झाली आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा तसंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करावी, अशी मागणी दानवे यांनी केली. पुण्यात स्वारगेट स्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेलं वक्तव्य असंवेदनशील असून त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असंही ते म्हणाले .
मुंबईतली अनेक महत्वाची कार्यालयं बाहेर नेऊन तिचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, अशी टीका दानवे यांनी केली. हे सरकार, शेतकरी, युवक यांच्या विरोधात आहे, या सरकारमध्ये कुणाचा कुणाला पायपोस नाही, सरकार विसंवादानं पोखरलेलं आहे अशी टीकाही दानवे यांनी केली. राज्यातली कायदा आणि सुव्यवथा बिघडली असल्याबद्दल शिवसेना उबाठा पक्षाचे आदित्य ठाकरे यांनीही प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीकेची झोड उठवली. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना महत्वाच्या पदावर बसवायचं हे सरकारचं धोरण आहे अशी टीका कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी या पत्रकार परिषदेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या पत्रकारपरिषदेत संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारवर टीका केली. या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मंत्री धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली.
Courtesy : Prasar Bharati












































































