Last Updated on 25 Feb 2025 9:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मराठी भाषा गौरव दिन हा कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन .त्यामुळे 27 फेब्रुवारी ही तारीख विशेष महत्त्वाची आहे. कुसुमाग्रजांच्या त्या काळात मराठी साहित्याला बहर आला होता. या काळात रसिक मनावर अधिराज्य गाजवण्यासाठीच निर्मात्याने सर्वांनाच पृथ्वीवरती पाठवले होते की काय ? इतके चतुरस्त्र मराठी साहित्य या काळात जन्माला आले. ज्ञानदेवांनीही यापूर्वी मराठीचे मोठेपण जाणून तिला अमृता बरोबर पैज लावून जिंकून आणल्याचे जे दिसते ते यामुळेच. कृष्णा सारख्या युगपुरुषाने सांगितलेली गीता वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली ते ज्ञानेश्वर या मराठीचे कौतुक करतात त्यांच्यापुढे आपण कोण?
पुण्यातील बालगंधर्व नाट्य मंदिरात बालगंधर्वांची स्त्री आणि पुरुष वेशातील दोन मोठी तैलीचित्रे लावण्यात आली. त्यावेळी चित्राखाली अगदी नेमकेपणाने बालगंधर्वांचे वर्णन करणाऱ्या ओळी पु. ल. देशपांडे यांना हव्या होत्या. पु. ल. देशपांडे यांनी ग .दि. माडगूळकर यांना ही मनातील गोष्ट बोलून दाखवली. ग. दि. माडगूळकरांना त्या क्षणी जे स्फुरले ते पु ल देशपांडे यांनी टिपून घेतले.
पुरुष वेशातील बालगंधर्वांचे वर्णन करताना ग दि माडगूळकर म्हणतात,||” जशा जन्मती तेज घेऊन तारा ,जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा येई कंठात घेऊन गाणे असा बालगंधर्व आता न होणे” ||तर स्त्री वेशातील बालगंधर्वांचे वर्णन करताना माडगूळकर म्हणतात, ||”रतीचे जया, रूप लावण्य लाभे ,कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे, सुधे सारखा साद ,स्वर्गीय गाणे ,असा बालगंधर्व आता न होणे”||
याच काळात गदिमांचे गीत रामायण जन्माला आले. गदिमांचे हे गीत रामायण वाचताना वाटते या सुंदर निर्मितीची देवता जर सरस्वती असेल तर या सरस्वतीने गदिमांच्या अंतरात काही काळ का होईना आपलं ठाणं मांडून हे सगळं घडवून आणले असेल. या गीत रामायणात शंकेला एकच जागा उरते की प्रत्यक्षात घडलेले रामायण तरी इतके सुंदर असेल का? हि ताकत गदिमांच्या शब्दांची तर आहेच पण ज्या भाषेत त्यांनी हे रामायण लिहिले ती भाषा सुद्धा तितकीच देखणी ,समृद्ध ,सुंदर, गोड….अशी आहे म्हणूनच हे शक्य झाले.
याच वेळी कुसुमाग्रजांचं साहित्य मराठी भाषेवर अधिराज्य गाजवत होते. त्यांची कविता स्वैरसंचार करत समाजाची त्यावेळची गरज पुरवत होती असे वाटते.
“गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार” असं म्हणत त्या वेळच्या तरुण पिढीला खडबडून जागं करत होती. आपली संस्कृती ही तरुण पिढी विसरते की काय? हे लक्षात घेता कुसुमाग्रजांनी एक सुंदर अशी नाट्यकृती “नटसम्राटच्या “रूपाने मराठी माणसासमोर आणली. त्यातील प्रतिभासंपन्न मराठी भाषा, पल्लेदार स्वगत ,ही नवीन पिढीने इतक्या आत्मीयतेने स्वीकारली की, नाट्य क्षेत्रातल्या तरुणाला नटसम्राट हे नाटक स्वतः करणे किंवा त्यातील स्वगत पाठ करणे यात आपल्या जीवनाची इतीकर्तव्यता मानावीशी वाटली. सावरकरांच्या मराठी कवितेचे वाचन करताना भाषेच्या प्रतिभेबरोबर त्या भाषेच्या पावित्र्याची जाणीव सुद्धा होते.
ज्ञानपीठ विजेत्या विंदा करंदीकर यांच्या कवितेचा बाज आणखीन वेगळाच जाणवतो. “सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी” एका कर्तव्यदक्ष गृहिणीचे इतके सुंदर वर्णन एखादी कवियत्री सुद्धा करू शकणार नाही. याच विंदा करंदीकरांनी तुकारामांच्या साहित्याला विल्यम शेक्सपियर याच्या साहित्याच्या पंक्तीत सहज बसवले आहे. त्याचे अतिशय सुंदर वर्णन “तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला”या कवितेत केले आहे. ||”तुका म्हणे विल्या, तुझे कर्म थोर! अवघाची संसार उभा केला!! शेक्सपियर म्हणे, एक ते राहिले तुवा जे पाहिले ,विटेवरी”!!
शब्दांची ताकद काय असते!! केवढ्या कमी शब्दात केवढा मोठा गर्भितार्थ विंदांनी उलगडला आहे.
बा.भ. बोरकर, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, कवितेला गझलच्या वाटेकडे सहजपणे नेणारे सुरेश भट यांच्यासारख्या कवींनी रसिक मनात आपले स्थान बळकट करून ठेवले होते, ते याच काळात. या कवींच्या बाबतीत एक गोष्ट चांगली घडत होती त्यांच्या कवितांना सुमधुर चाली मिळत गेल्या त्यामुळे सर्वांपर्यंत त्या कविता गीत रूपाने पोहोचल्या.
मराठी भाषा पद्यात अशी स्वैर बागडत असताना गद्यात सुद्धा विविध अंगानी मोहिनी टाकत होती. यात शिवाजीराव सावंत, रणजित देसाई, ना.स. इनामदार यासारख्या लेखकांनी वाचकांची पकड एवढी घट्ट केली होती की वाचक अक्षरशः बेभान होऊन वाचायला शिकले. या गद्य लेखनात अलंकार, उपमा, यमक, उत्प्रेक्षा… या सर्वांची इतकी लयलूट झालेली वाचायला मिळते. त्यावेळी भाषेचे सौंदर्य काय असतं ते खऱ्या अर्थाने कळत.
याच काळात दलित साहित्याने खूप मोठी झेप घेतली होती. त्यातील दाहक वास्तवतेचे वर्णन वाचून उच्चभ्रू समाज सुद्धा हेलावून गेला होता. मन विषण्ण करणारे ते साहित्य होते. यात दया पवारांचं बलुत, उत्तम कांबळे यांचे समग्र साहित्य, शंकरराव खरात यांचे “तराळ अंतराळ” या साहित्याचा समावेश होतो या साहित्याच्या वास्तवतेची बरोबरी करणार, बहुजन समाजातील स्थितीचं अतिशय बारकाईनं वर्णन करणारी आणि मनाला विचार करायला भाग पाडणारी आनंद यादव यांची “झोंबी” पण होती. या साहित्याने तरुण पिढीला खूप काही शिकवले.
जी. ए .कुलकर्णी यांच्या गुढ कथा आणि प्रतिवर्षी प्रसिद्ध होणारे दिवाळी साहित्यांचे अंक यामुळे वाचकांची वाचण्याची अभिरुची अजूनही वाढली.
आचार्य अत्रे यांच्यानंतर काही काळानंतर विनोदी साहित्यात अत्यंत मोलाची भर टाकली ती पु. ल. देशपांडे यांचे साहित्याने. विनोदी अंगाने जाणारे त्यांचे साहित्य बघता बघता केव्हा चटका लावेल हे वाचताना लक्षात येत नव्हतं. प्रत्येक गोष्टीच इतकं बारकाईने केलेले वर्णन खूप क्वचितच वाचायला मिळते. पुलंची “बटाट्याची चाळ” आज एखाद्या सुख वस्तू सदनिकेमध्ये राहणाऱ्या च्या समोर सुद्धा चाळी चा नेमकेपणा उभा करू शकते. पुलंची “ती फुलराणी” हे खरे तर रूपांतरित नाटक. पण मराठी भाषेतल्या शब्दांची केलेली पखरण इतकी सुंदर आहे की ते भाषांतरित नाटक राहतच नाही. किंबहुना मूळ नाटकाच्या संहितेची कल्पना करण्याचे कारणच उरत नाही.
आध्यात्मिक साहित्याचे क्षेत्र विस्तृत करणारे दोन ग्रंथ रामदासांचा दासबोध आणि तुकाराम गाथा यांचे स्थान कालातीत आहे. समाज कितीही बदलला, चालीरीती बदलल्या, कितीही आधुनिकीकरण झाले तरी ,या दोन ग्रंथांजवळ येऊन, त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं लागेल, इतकं प्रचंड चैतन्य यातून घेण्यासारखं आहे.
कोणतीही भाषा वळवेल तशी वळत असेेल पण मराठी भाषेचा वळतानाचा बाज काही वेगळाच. तिचं सौंदर्य, तिची निकोपता अबाधित राहावी यासाठी ज्यांनी आपले लिखाण समृद्ध करून वाचकांपुढे ठेवलं त्यात समीक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. यात नरहर कुरुंदकर, य. दि. फडके यांच्या नामोल्लेखा शिवाय हे लिखाण पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात श्रेष्ठ साहित्यिकांनी अथक प्रयत्न केले त्या सर्वांना आपल्या सर्वांचे विनम्र अभिवादन!!
वंदना प्रकाश माने
राजाचे कुर्ले
7387866565












































































