Last Updated on 27 Oct 2024 8:37 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । अंतराळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं योगदान सध्या २ टक्के आहे, मात्र, आगामी दशकात हे योगदान १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं, उद्दिष्ट आहे, असं इस्रोचे अध्यक्ष डाॅ. एस सोमनाथ यांनी सांगितलं.
नवी दिल्लीत शनिवारी आकाशवाणी भवन इथं, सोमनाथ यांनी सरदार पटेल स्मृती व्याख्यान दिलं. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या देशातून अंतराळ यान प्रक्षेपित करण्याची क्षमता, हे भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य असल्याचं, त्यांनी सांगितलं.
अंतराळ क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या गरजेवर भर देताना सोमनाथ यांनी या क्षेत्रातल्या भारताच्या नवीन धोरणांवर प्रकाश टाकला. भारतानं, भारतीय अंतराळ धोरण २०२३ लागू केलं आहे, तसंच अंतराळ क्षेत्रात परकीय गुंतवणुकीलाही सुरुवात केली आहे. २०१४ मध्ये, देशात अंतराळ क्षेत्रात केवळ १ स्टार्टअप उद्योग होता. मात्र, सध्या देशात २०० स्टार्टअप आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला, प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल, मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर उपस्थित होत्या.












































































