Last Updated on 25 Mar 2022 1:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
टप्प्याटप्प्याने सुरु होणार भरती प्रक्रिया
एका दृष्टीक्षेपात…
राज्यात विविध शासकीय विभागांसाठी एकूण ११ लाख ५३ हजार ४२ पदे मंजूर
त्यातील ८ लाख ७७ हजार ४० पदे भरलेली,तर २ लाख ३ हजार ३०३ पदे रिक्त
ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाचा मिळून १५ हजार ४२६ पदांचा अनुशेष
गृह,आरोग्य आदी विभागांची भरती प्रक्रिया ताबडतोब राबवली
मुंबई ।
राज्यात विविध शासकीय विभागांसाठी एकूण ११ लाख ५३ हजार ४२ पदे मंजूर असून त्यातील ८ लाख ७७ हजार ४० पदे भरलेली आहेत तर २ लाख ३ हजार ३०३ पदे रिक्त आहेत.राज्यात कोविड प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या काळात पदांची भरती होऊ शकली नाही, मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवून भरती प्रक्रियेला गती दिली आहे.दरम्यान,एमपीएससीला नुकतेच राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ, गट-ब आणि गट-क च्या तब्बल 6 हजार 356 जागा भरण्याची गरज असल्याचे मागणीपत्र दिले आहे.
मागील पाच-सहा वर्षात काही अपवाद वगळता सरकारी नोकर भरती झालेली नाही.महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. दरवर्षी 9 टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असतात.विधानसभेतही कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे.
राज्यात शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवेच्या कोट्यात ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाचा मिळून १५ हजार ४२६ पदांचा अनुशेष असून हा अनुशेष भरुन काढण्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १४ आणि २२ फेब्रुवारी २०२२ च्या पत्रान्वये सर्व प्रशासकीय विभागांकडून ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच्या अनुशेषाच्या पदांची माहिती मागविण्यात आलेली आहे,अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली होती
राज्यात विविध शासकीय विभागांसाठी एकूण ११ लाख ५३ हजार ४२ पदे मंजूर असून त्यातील ८ लाख ७७ हजार ४० पदे भरलेली आहेत तर २ लाख ३ हजार ३०३ पदे रिक्त आहेत. राज्यात कोविड प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या काळात पदांची भरती होऊ शकली नाही,मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवून भरती प्रक्रियेला गती दिली आहे.गृह, आरोग्य आदी विभागांनादेखील पद भरतीची परवानगी दिली असून भरती प्रक्रिया ताबडतोब राबवली जाणार आहे.
शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवेच्या कोट्यातील भरती प्रक्रिया करण्यासाठी विविध विभागांकडून १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले असून ७ हजार ३६६ पदांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे.या सहा महिन्यात साधारणतः ६ हजार २०० पदांकरिता ३०० जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून लवकरच १ हजार ७०० पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करुन भरती प्रक्रिया राबविण्यात येईल असे सांगून गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उत्तम काम केले असल्याचेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान,गुरुवारी (२४ मार्च} राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ, गट-ब आणि गट-क च्या जागा भरण्यासाठी मागणीपत्र दिले आहे.महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 24 मार्च 2022 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.












































































