Last Updated on 15 Dec 2025 9:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केला. आज (सोमवार) सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेऊन वाघमारे यांनी महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात येणार असून १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येणार आहे. जात वैधता पडताळणीसाठी राखीव जागेवर लढणाऱ्यांना जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार. सत्यप्रत वा अन्य पुरावा द्यावा. त्यानंतर सहा महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्याचं हमी पत्र द्यावी लागेल. नाही दिलं तर निवड रद्द होणार आहे.
निवडणुकांसाठी मतदान १५ जानेवारीला, १६ ला मतमोजणी
या निवडणुकीसाठी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी ३१ डिसेंबर तर उमेदवारी माघारीसाठी ०२ जानेवारी २०२६ पर्यंत असणार आहे. तर मतदान १५ जानेवारीला होणार असून, मतमोजणी १६ जानेवारीला होणार आहे.
नामनिर्देशन पत्र : २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
छाननी : ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी माघार : २ जानेवारी २०२६
चिन्हवाटप : अंतिम उमेदवार यादी ३ जानेवारी २०२६
मतदानाची तारीख : १५ जानेवारी २०२६
मतमोजणी : १६ जानेवारी २०२६
🔸एकूण २९ महानगरपालिका निवडणूक जाहीर
🔸एकूण २८६९ जागांसाठी निवडणूक
🔸महिला – १४४२
🔸अनुसुचित जाती – ३४१
🔸अनुसुचित जमाती – ७७
🔸नागरिकांचा मागास प्रवर्ग – ७५९
या महानगरपालिकांच्या होणार निवडणुका
१) अहिल्यानगर महानगरपालिका २) अकोला महानगरपालिका ३) अमरावती महानगरपालिका ४) भिवंडी निजामपूर महानगरपालिका ५) बृहन्मुंबई महानगरपालिका ६) चंद्रपूर महानगरपालिका ७) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ८) धुळे महानगरपालिका ९) इचलकरंजी महानगरपालिका १०) जळगाव महानगरपालिका ११) जालना महानगरपालिका १२) कल्याण डोंबिवली महानगरपालिका १३) कोल्हापूर महानगरपालिका १४) लातूर महानगरपालिका १५) मालेगाव महानगरपालिका १६) मीरा भाईंदर महानगरपालिका १७) नागपूर महानगरपालिका १८) नांदेड वाघाळा महानगरपालिका १९) नाशिक महानगरपालिका २०) नवी मुंबई महानगरपालिका २१) पनवेल महानगरपालिका २२) परभणी महानगरपालिका २३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका २४) पुणे महानगरपालिका २५) सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका २६) सोलापूर महानगरपालिका २७) ठाणे महानगरपालिका २८) उल्हासनगर महानगरपालिका २९) वसई-विरार महानगरपालिका
बहुसदस्यीय पद्धत
बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व २८ महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व २८ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने किमान ३ ते ५ मते देणे अपेक्षित असेल.
नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर
मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हापरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी त्या देखील ३१ जानेवारीच्या आधी घेतल्या जाण्याची शक्यता आहे.













































































