Last Updated on 01 Jul 2020 3:29 AM by
आषाढीपासून करोनाचे संकट नष्ट होवो; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे
पंढरपूर : करोनामुळे विविध नियम बंधनांमध्ये पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली.दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अगदी उत्साहात साजरा केला जाणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,तेजस ठाकरे,पालकमंत्री दत्ता भरणे,मिलिंद नार्वेकर,मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली.यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला.
कोरोनामुळे जग,देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे.कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे आणि माझ्या बळीराजाला सुख,समाधान आणि भरभराट येऊ दे,असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले.श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली.पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा झाली.
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आषाढ शुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास शोभेच्या जांभळ्या,पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या फुलांनी सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.
दरम्यान, आषाढी यात्रेच्या इतिहासात यंदा प्रथमच करोनामुळे आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूर नगरी वारकऱ्यांविना ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. आषाढी यात्रा म्हटले की,ज्या मंदिर परिसरात यात्रेच्या आदल्या दिवसापासून मुंगी शिरायलाही जागा नसायची त्या संपूर्ण परिसरात मंगळवारी शुकशुकाट पसरला होता. मानाच्या संतांच्या पादुका मंगळवारी सायंकाळी सरकारी नियमांच्या चौकटीत वाखरी येथे पोहोचल्या. या पादुका पहिल्यांदाच अवघ्या २० भाविकांसह एसटी बसेसमधून आणल्या गेल्या.पादुका उतरल्यावर सोबत आलेल्या सर्व मानकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जे पालखी सोहळे लाखोंचा वारकरी भक्तमेळा घेऊन चालतात त्यांना यंदा करोनामुळे बसेसमधून येण्याची वेळ आली.वाखरी येथे शासनाच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोहळ्याचे स्वागत केले.यानंतर या पालख्यांच्या भेटीला पंढरपुरातून संत नामदेवरायांच्या पादुका सजवलेल्या बसमधून पंढरपूरच्या विसाव्यापर्यंत गेल्या आणि सर्व मानाच्या पालख्यांचे बसमधूनच पंढरपुरात आगमन झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन श्री.ठाकरे यांनी भाविकांना केले.वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष साधना भोसले,समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,संभाजी शिंदे,शिवाजीराव मोरे,माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर,अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले,पोलीस महानिरीक्षक सुहास वारके,पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव,मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.













































































