Last Updated on 05 Jun 2025 8:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शेती उत्पादनवाढीसाठी खत व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे असून, योग्य वेळी, योग्य मात्रेत व समतोल खतांचा वापर केल्यास केवळ उत्पादनात वाढ होत नाही, तर जमिनीची सुपीकता व टिकाऊपणाही अबाधित राहतो. रासायनिक, जैविक व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलन साधणारे “संयुक्त मिश्र खते” हे घरच्या घरी बनवता येणारे, शाश्वत व किफायतशीर उपाय आहे.
पिकांचे खत व्यवस्थापन का आवश्यक आहे?
प्रत्येक पिकास लागणाऱ्या अन्नद्रव्यांची गरज वेगळी असल्याने खत व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. माती परीक्षणाच्या आधारे अचूक खत वापर निश्चित करता येतो. मात्र प्रत्येकवेळी माती परीक्षण शक्य नसल्यास, त्या परिसरातील जमिनीच्या सुपीकतेच्या निर्देशांकानुसार खतांचे प्रमाण निश्चित करावे. ही माहिती स्थानिक कृषि सहाय्यकाकडे उपलब्ध असते.
खत व्यवस्थापनातील महत्त्वाचे घटक
1. बीजप्रक्रिया:
उत्पादनवाढीसाठी पेरणीपूर्वी बियाणांची जैविक खतांद्वारे प्रक्रिया करावी. तृणधान्यांसाठी अॅझेटोबॅक्टर, कडधान्यांसाठी रायझोबियम आणि सर्वसाधारणपणे पीएसबी या जिवाणूंनी बियाणे प्रक्रिया करावी.
2. खते देण्याची योग्य पद्धत:
खते उधळण्याऐवजी दोन चाड्यांच्या पाभरीने, पट्टा पद्धतीने वापरणे उपयुक्त ठरते. खते पेरणीपूर्वी तयार करू नयेत, तर वापरण्याच्या वेळीच मिश्रण तयार करावे.
3. विशेष जमीन व पिकांसाठी उपाय:
चूनखडीयुक्त जमिनीत अमोनियम सल्फेटचा वापर करावा. हरभरा व गहू पेरणीवेळी झिंक सल्फेट व निंबोळी पेंड मिसळल्यास चांगला परिणाम मिळतो. सूर्यफुल फुलवण्यासाठी पिक फुल या विद्राव्य खताची फवारणी करावी. नत्राचे प्रमाण जमिनीच्या गरजेनुसार २५ टक्क्यांनी कमी अथवा जास्त करावे.

4. संयुक्त मिश्र खतांचा वापर:
दीर्घकालीन पिकांसाठी नत्र, स्फुरद, झिंक व गंधक यांचे संतुलित मिश्रण स्वरूपातील संयुक्त मिश्र खते अधिक फायदेशीर ठरतात. या खतांचे वापराने उत्पादनात सातत्य आणि जमिनीच्या पोषणमूल्यांची योग्य निगा राखता येते.
5. खते देताना लक्षात ठेवाव्यात अशा बाबी:
जमिनीत पुरेसा ओलावा असताना खते द्यावीत. जिरायत शेतीमध्ये पेरणीनंतर खते टाकावीत. जास्त पावसाचा प्रदेश असल्यास नत्रयुक्त खते विभागून देणे उपयुक्त ठरते. युरिया वापरताना त्यास २० टक्के निंबोळी पेंड, गंधक वेष्टन किंवा जिप्सम वेष्टन करावे.
स्फुरद कार्यक्षमतेत वाढ कशी करावी?
स्फुरदाची हालचाल मर्यादित असल्याने, स्फुरदयुक्त खते बियाण्यापासून सुमारे ५ सेमी खोलीवर पट्टा पद्धतीने पेरावीत. दाणेदार स्फुरद खते अधिक परिणामकारक ठरतात. चुनखडीयुक्त जमिनीत रॉक फॉस्फेट + शेणखत हे मिश्रण उपयुक्त ठरते. तर सुपर फॉस्फेट + गोबर गॅस मळी किंवा कोंबडी खत यांचा वापर उत्तम परिणाम देतो.
पीएसबी जिवाणूचा वापर शेणखतामध्ये मिसळून किंवा बीजप्रक्रियेद्वारे केल्यास जमिनीत स्फुरदाची उपलब्धता वाढते.
स्त्रोत : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
संकलन – युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव








































































