Last Updated on 23 Oct 2024 9:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
१५ जागांवरून वाद, मविआचा घोळ मिटता मिटेना
मुंबई । महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख पक्षांमध्ये ८५-८५-८५ असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. तसेच उर्वरित 18 मतदारसंघ महाविकास आघाडी मित्र पक्षांना सोडणार आहे. महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज वाय. बी. चव्हाण सेंटर येथील बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत माहिती दिली.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांसोबत आमची बैठक पार पडली. महाविकास आघाडीचे जागावाटप सुरळीत पार पडले आहे. तिनही पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस आणि मित्र पक्षांना सामावून घेणारे आमचे जागावाटप पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडीचा ८५-८५-८५ असा फॉर्म्युला ठरला असून तीनही पक्ष साधारण २७० जागांवर आमची सहमती झाली आहे. त्याची यादीही आम्ही बनवली आहे. उर्वरीत जागा मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय होईल. या सर्व जागा महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीने लढून सत्तेवर येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
नाना पटोले म्हणाले, तीन राजकीय पक्षांची बैठक शरद पवार यांच्यासमोर झाली. ८५-८५-८५ या जागांवर मिळून एकूण २७० जागांवर एकमत झालं आहे. उर्वरित १८ जागांवर शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षांसोबत चर्चा सुरु आहेत. उद्या या जागांवर आमच्यामध्ये स्पष्टता येईल. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्रात मविआचं सरकार येईल, असं नाना पटोले म्हणाले.
तरी १५ जागांवरून वाद, मविआचा घोळ मिटता मिटेना
८५-८५-८५ अशी बेरीज केली तर ती 255 इतकीच होत असून १८ जागा मित्र पक्षांना सोडणार असल्याचे महाविकास आघाडीने सांगितले. त्यानुसार २७३ जागांचे गणित जुळल्याचे दिसून येत आहे. तरी १५ जागांचा वाद असूनही निवळला नसल्याचे यातून स्पष्ट होते. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा दावा असणाऱ्या ४ ते ५ मतदारसंघात ठाकरे गटाकडून थेट उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.












































































