Last Updated on 14 Oct 2021 4:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
जग ब्रिक्सचे15 वे स्थापना वर्ष साजरे करत आहे आणि त्याचे अध्यक्षपद भारत भूषवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले, यापूर्वी वर्ष 2016 मध्ये गोवा शिखर परिषदेचे ते अध्यक्ष होते. ‘निरंतरता, एकजुटता आणि सहमतीसाठी सहकार्य’ या संकल्पनेवर आयोजित शिखर परिषदेत भारताने ठामपणे दहशतवादाविरोधात आपली भूमिका मांडली . तसेच, विकसनशील देशांच्या प्राथमिकतांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘ब्रिक्स मंच’ उपयुक्त असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबर 2021 रोजी आभासी माध्यमातून 13 व्या ब्रिक्स (ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका) शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. वर्ष 2021 मध्ये भारताकडे ब्रिक्सचे अध्यक्षपद आहे. या बैठकीला ब्राझीलचे राष्ट्रपती महामहिम जाइर बोलसोनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपति साइरिल रामाफोसा उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले, “ब्रिक्स शिखर परिषदेत तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे. ब्रिक्सच्या 15 व्या स्थापना दिनी या परिषदेचे अध्यक्षपद भूषवणे माझ्यासाठी आणि भारतासाठी आनंदाची बाब आहे.” ब्रिक्सचा महत्वाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की गेल्या दीड दशकात ब्रिक्सने अनेक आघाड्यांवर यशस्वी कामगिरी केली आहे. आज आपण जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावशाली आवाज आहोत. विकसनशील देशांच्या प्राथमिकतांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी देखील हा मंच उपयुक्त ठरला आहे. त्यांनी महत्वपूर्ण गोष्ट सांगितली :
ब्रिक्स आगामी 15 वर्षांमध्ये आणखी परिणामकारक होईल याकडे आपण लक्ष द्यायला हवे.
ब्रिक्स डिजिटल आरोग्य परिषद तंत्रज्ञानासह आरोग्य पोहोच वाढवण्यासाठी एकअभिनव पाऊल आहे.
आपल्या सीमाशुल्क विभागांमध्ये सहकार्यातून आंतर -ब्रिक्स व्यापार सुलभ होईल. एक व्हर्चुअल नेटवर्क म्हणून ”ब्रिक्स लस संशोधन आणि विकास केंद्र ” सुरु करण्याबाबत देखील सहमती झाली.
”हरित पर्यटनावरील ब्रिक्स आघाडी ” हा आणखी एक नवीन उपक्रम आहे.
ब्रिक्सने प्रथमच बहुपक्षीय प्रणाली मजबूत करण्याबाबत एक सामायिक भूमिका घेतली आहे.
ब्रिक्सने दहशतवादाविरोधात कृती योजना देखील स्वीकारली आहे.
ब्रिक्स मध्ये भारताची चार प्राधान्य क्षेत्र आहेत-
1 बहुपक्षीय प्रणालीत सुधारणा
2 दहशतवादाला विरोध
3 शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी डिजिटल आणि तांत्रिक उपायांचा अवलंब
4 लोकांमधील संवाद आणि आदानप्रदान वाढवणे
ब्रिक्स परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
न्यू इंडिया समाचार














































































