Last Updated on 22 Jul 2020 5:15 PM by
महाराष्ट्राच्या या समृद्ध परंपरेतली एक किल्ला म्हणजे पांडवगड. हा किल्ला सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यामधील एक किल्ला आहे. हा समुद्रसपाटीपासून ४१७७ फूट उंच असून, वाईच्या वायव्येस ४ मैलांवर आहे. पन्हाळ्याचा दुसरा भोज (११७८-९३) कोल्हापूर सिलाहार संस्थानिक याने हा किल्ला बांधला असे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो १५७३ मध्ये ताब्यात घेतला.
महाराष्ट्र आणि विशेषतः सह्याद्री रांगातील प्रदेश गडकिल्ल्यांनी समृद्ध आहे. या किल्ल्यांनी इतिहासाची अनेक पाने प्रत्यक्ष पाहिली आहेत, अनुभवली आहेत. भरभराटीचे दिवस पाहिले आहेत तसेच युद्धाचे प्रसंगही पाहिले आहेत. पांडवगडाच्या उत्तरेला भग्न दरवाजाने गडामध्ये प्रवेश होतो. वाटेमध्ये पाण्याची दोन टाकी आहेत. गडावर हनुमंताचे मंदिर आहे. गडावर गडाची देवी पांडवजाईचे मंदिर आहे. गडाच्या चारही बाजूंना नैसर्गिक कातळकडे असल्यामुळे गडावर फारशी तटबंदी बांधलेली नाही. गडाचे गडपण दाखविणारी घरांची जोती तसेच कोरडी पडलेली पाण्याची टाकी आढळतात. कृष्णा नदीच्या उत्तर बाजूस रायरेश्वरापासून निघणारी महादेव रांग आहे. सह्याद्रीच्या या उपरांगेतील एका शृंगावर पांडवगड आहे. समुद्रसपाटीपासून १२७३ मीटरची उंची (४१७०फूट) असलेल्या पांडवगडाला वाईवरून जाता येते.
या पांडवगडाकडे जाण्यासाठी दोन वाटा. एक वाईजवळच्या मेणवली गावातून, तर दुसरी धावडी गावच्या हद्दीतून. दोन्हीही वाटा अंगावर येणाऱ्या पण त्यातही धावडीकडची तुलनेने थोडी कमी श्रमाची!.मुळात इकडे फारसे कुणी येत नाही. स्थानिक चार गावकरी-गुराख्यांनी वर्दळीखाली ठेवलेली ही वाट, पण पावसाळा उलटला की या गडावर बेसुमार गवत माजते आणि मग त्याखाली आहे ती वाट देखील झाकून जाते. हे गवतही अगदी राक्षसी! आकाशाकडे धावणारे, चांगले पुरुषभर उंचीचे. गवताच्या या दाटीतूनच मार्ग काढत, शोधत गडाकडे सरकावे लागते. साऱ्या अंगाला कुसळ, काटे टोचू लागतात. सरपटणाऱ्या जिवांचे भय ते निराळेच. खरेतर पावसाळ्यानंतरचा हंगाम भटकंतीसाठी सुगीचा पण पांडवगडाबाबतीत या गवतामुळे तो साफ चुकीचा म्हणावा लागेल. इकडे आलात की, सावधपणे फिरा, पायात बूट तर आवश्यकच! पावसाळा संपला की गडावर बेसुमार पुरुषभर उंचीचे गवत माजते. पायवाटही झाकून जाते. वाट शोधून तीवरून चालताना साऱ्या अंगाला कुसळी काटे टोचू लागतात. पायांत चांगले बूट असल्याखेरीज गडावर येणे धोक्याचे आहे.
माचीवरून पुढे निघताच वाटेत दोन पाण्याच्या टाक्या लागतात. गडावर एकूण दहा ते पंधरा खोदीव टाक्या, एक-दोन मोठाली तळी देखील. पण या साऱ्यांतले पाणी आणि त्यांचे रंग मात्र पहिल्याहून निराळे. पुढे निघताच बालेकिल्ल्यातील प्रवेशमार्ग येतो. एक खणखणीत बुरुज, त्याला लागून कड्याला समांतर प्रवेशद्वाराची कमान आणि त्यालगत काही अंतरापर्यंत चिरेबंदी तट! यातील दरवाजाची कमान तेवढी पडलेली, अन्य बांधकाम आजही ताजे. त्याच्याकडे पाहताच पांडवगडाचे दुर्गपण जागे होते. पांडवगडाला चहुबाजूंनी ताशीव खोल कडे यामुळे तटबंदीची आवश्यकता जिथे आहे तिथेच ती घातलेली. तटबंदीच्या या माऱ्यातून एक वळण घेत आपण बालेकिल्ल्यावर येतो. वर येताच भोवतीचे गवत पुन्हा घट्ट होते. मग यातूनच एकेका अवशेषांची शोधाशोध सुरू करावी लागते. गडावरून धोम धरणाचा जलाशय सुरेख दिसतो. जलाशयामागे कमळगडाचा उंचावलेला माथा दिसतो. त्यामागे महाबळेश्वराचे तसेच पाचगणीचे पठार ओळखू येते. पांडवगडाच्या माथ्यावरून खाली वाई तसेच कृष्णा नदीही दिसते. केंजळगड, मांढरदेव, चंदन वंदन किल्ले तसेच वैराटगड सुद्धा पहाता येतो.








































































