Last Updated on 19 Nov 2021 11:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
हैदराबाद ।
तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सदस्यांद्वारे त्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ ते उर्वरित कालावधीसाठी विधानसभेत प्रवेश करणार नाहीत असे जाहीर केले आहे.यानंतर मी या बैठकीला उपस्थित राहणार नाही.मी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावरच सभागृहात परतेन असे चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.विधानसभेतून बाहेर पडण्यापूर्वी नायडू खूपच भावूक दिसत होते.त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते.
त्यानंतर, मंगलागिरी येथील टीडीपीच्या राज्य मुख्यालयात पत्रकार परिषदेत संबोधित करताना, ७१ वर्षीय नायडू यांना अश्रू अनावर झाले. काही मिनिटे ते बोलू शकले नाहीत, कारण त्यांचा आवाज भरलेला होता. हाताने चेहरा झाकून ते काही मिनिटे रडत होते.ते म्हणाले, माझी पत्नी कधीही राजकारणात आली नाही. मी सत्तेत असो किंवा बाहेर असो, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला प्रोत्साहन देण्याशिवाय राजकारणात त्यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही.तरीही त्यांनी माझ्या पत्नीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला.
हिवाळी अधिवेशनात महिला सक्षमीकरणावर चर्चा सुरू होती.यावेळी सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी नायडू आणि त्यांच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले.त्यावर नायडू यांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, पुन्हा मुख्यमंत्री होईपर्यंत विधानसभेत पाऊल टाकणार नाही, अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना नायडूंना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की,आता सहन होत नाही.मागील अडीच वर्षे मी सगळे काही सहन करीत होतो परंतु,मी शांत होतो.आज त्यांनी माझ्या पत्नीलाच लक्ष्य केले.मी कायम सन्मानाने जगलो असून,सन्मानासाठी जगलो आहे.आता हे सहन करण्यापलिकडे गेले आहे.
जयललितांनीही शपथ घेतली होती
25 मार्च 1989मध्ये तामिळनाडूच्या विधानसभेतही अशीच घटना घडली होती. एआयएडीएमके नेत्या जयललिता यांचा सभागृहात अपमान करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनीही जोपर्यंत सत्तेत येत नाही तोपर्यंत विधानसभेत जाणार नसल्याची शपथ घेतली होती. जयललिता यांचा हा राजकीय ड्रामा असल्याची टीकाही त्यावेली झाली होती. मात्र, त्यानंतर त्या सत्तेत आल्या होत्या.










































































