Last Updated on 05 Aug 2021 4:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भारतीय हॉकीची ऑलिम्पिकमध्ये ‘फिनीक्स’भरारी
41 वर्षांनंतर सुवर्णक्षण,ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमने रचला इतिहास
टोकियो : एक-दोन नव्हे तर तब्बल 4 दशकांचा दुष्काळ संपवत भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले. भारताने जर्मनी सोबत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अंतिम बाजी मारली आणि विजयपताका फडकावली.भारताने जर्मणीसोबत झालेल्या सामन्यात हा विजय 5-4 अशा फरकाने मिळवला आणि पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारताचा सामना तगड्या जर्मनीसोबत होता.दोन्ही संघांना सेमीफायनल सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.त्यामुळे कांस्य पदकासाठी दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हाता तोंडाशी आलेले सूवर्ण आणि रौप्य पदक दूर गेल्यामुळे दोन्ही संघामध्ये एक रुखरुख होती.त्यामुळे कांस्य पदकावर दावा सांगण्यासाठी दोन्ही संघ सर्वशक्तीनिशी एकवटले होते. दोन्ही संघांनी खेळीही तशीच साजेशी केली.अंतिम खेळी मात्र भारताचीच वरचढ ठरली.शेवटच्या गोलमुळे भारताचे पारडे 5-4 ने जड झाले.ज्याने भारताला कांस्यपदक मिळवून दिले.
भारताने या सामन्यात खराब सुरुवात केली आणि जर्मनीने सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला गोल करून 0-1 अशी आघाडी घेतली होती .तैमूर ओरुजने जर्मनीसाठी हा गोल केला. पाचव्या मिनिटाला भारताला पुनरागमन करण्याची संधी मिळाली पण रुपिंदर पाल सिंगला पेनल्टी कॉर्नरमध्ये रुपांतर करण्यात अपयश आले. पहिल्या क्वार्टरच्या समाप्तीनंतर जर्मनीने भारतावर 0-1 अशी आघाडी कायम राखली. मात्र,भारताचा गोलरक्षक श्रीजेशचे या क्वार्टरमध्ये काही चमकदार बचाव पाहायला मिळाले.
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताने शानदार पुनरागमन केले आणि 17 व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगच्या शानदार मैदानी गोलमुळे सामना 1-1 बरोबरीत आणला. परंतु यानंतर जर्मनीने भारतीय बचावावर दबाव आणण्यास सुरुवात केली आणि दोन मिनिटांच्या अंतरात दोन गोल करत भारतावर 3-0 अशी आघाडी घेतली.
हार्दिक सिंहने या सामन्यात भारताला तिसऱ्या क्वार्टरमध्ये पुनरागमन करत आणि 26 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर करून स्कोर 2-3 केला. यानंतर भारताने पुन्हा एकदा शानदार पुनरागमन केले आणि जर्मनीच्या बचावावर सतत दबाव ठेवला. 28 व्या मिनिटाला त्याला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, यावेळी हरमनप्रीत सिंगच्या ड्रॅग फ्लिकने भारताला 3-3 ने बरोबरीत रोखले.
रुपिंदर पाल सिंगने 31 व्या मिनिटाला भारतासाठी चौथा गोल केला. रुपिंदर पाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर हा गोल करत संघाला 4-3 ने पुढे केले. तीन मिनिटांनंतर, 34 व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने शानदार मैदानी गोल करत भारताला या सामन्यात 5-3 अशी आघाडी मिळवून दिली.
चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीपासूनच जर्मनीने आक्रमक हॉकी खेळून भारतावर दबाव आणण्यास सुरुवात केली.जर्मनीने चौथा गोल करत पुन्हा एकदा हा सामना 5-4 च्या स्कोअरसह रोमांचक वळणावर आणला.पण अखेर शेवटी भारताने हा सामना 5-4 ने जिंकत इतिहास रचला.














































































