Last Updated on 15 Sep 2022 8:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू हसन नदाफ (वय 103 वर्षे) यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड, कॅप्टन रामचंद्र लाड, माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील, बर्डे गुरुजी यांच्या सोबत सांगली जिल्ह्यात क्रांतिकारकांची फौज उभी राहिली. त्या तुफान सेनेतील एक क्रांतिकारक म्हणजे बाबू हसन नदाफ. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावातील एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील जन्माला आलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ हे गांधीजी आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराने भारावून जाऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते.

भूमिगत होऊन तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वे रूळ उखडणे, रेल्वे लुटणे अशा धाडसी पणाने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र चळवळीत मोठा सहभाग घेतला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर अटक वॉरंट काढले. ते सापडत नाहीत म्हटल्यावर पकडून किंवा पत्ता सांगणाऱ्यास बक्षीस ही ठेवले. पुढे शेनोळी येथे रेल्वे लुटणे होत असताना गोळीबार झाला त्यावेळी पोलिसांना चकवा देऊन पळताना श्री. बाबू नदाफ आणि त्यांचे सहकारी बापू शेवाळे हे दोघे जखमी झाले. श्री बाबू नदाफ यांना पायाला गोळी लागली त्यामुळे जखमी असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. कोल्हापूरला जेलमध्ये नेत असताना वॉन्टेड क्रांतिकारक जिवंत पकडला म्हणून बक्षिसांची रक्कम पोलिसांनी त्यांच्या अंगावर उधळून आनंद साजरा केला होता.

श्री. बाबू नदाफ यांना पुणे येथील येरवडा तुरुंगात 3 वर्षाची शिक्षा झाली होती. ती शिक्षा भोगून बाहेर आले आणि पुन्हा चळवळीत सक्रिय झाले होते. 1942 च्या लढ्याअगोदर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद सेने मध्येही त्यांनी कॅप्टन शाहनवाज खान यांची भेट घेतली व सहभाग घेतला होता. परंतु बाहेर देशात त्यांना जाता आले नाही. पुढे 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. देश स्वतंत्र झाला. पुढे 1988 मध्ये कै. राजीव गांधी प्रधानमंत्री असताना ” ताम्रपट” देऊन त्यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने ही त्यांचा सन्मान केला आहे. 2022 चालू वर्षात सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस या नवीन रेल्वे गाडी चे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन ही श्री. बाबू नदाफ यांच्याहस्ते करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त 15 ऑगस्ट 2022 रोजी शासनाच्या वतीने त्यांचा तासगाव येथे सन्मानही करण्यात आला.अशा या क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन…
Post Views: 808