Last Updated on 31 Jul 2020 12:39 PM by
सांगली/प्रशांत चव्हाण
चीनमधून आलेल्या एका विषाणूने अवघ्या जगाची घडी विस्कटली आहे. सुरुवातीच्या काळात अत्यंत जीवघेणा आजार म्हणून ओळख असणाऱ्या कोरोना विषयी साहजिकच प्रचंड भिती आणि घबराटीचे वातावरण होते. या काळात डॉक्टर एक नंबरचा आणि पोलीस दोन नंबरचा देव बनला. डॉक्टर आणि पोलिस यांच्या भरोवशावर आपण घरात लॉकडाऊन झालो,मात्र डॉक्टर देखील माणूसच आहे, त्यालाही कुटुंब आहे, मूलबाळ आहेत.याबाबत आपण गाफीलच राहिलो, मात्र महाराष्ट्रातील एक डॉक्टर अशा आहेत की मार्चपासून आज पर्यंत सलग सोळा सोळा तास मुंबईसारख्या हॉटस्पॉट एरियात स्वतःच्या मुलांना दूर लोटून समाज सेवा करत आहेत, चीन मधून आलेल्या प्रवाशांसह इतर देशातील जवळपास 250 प्रवाशांची तपासणी करणाऱ्या डॉ अश्विनी वाघमारे-नाईकनवरे या गेली सहा महिने अविरतपणे कोरोना योद्धा म्हणून कार्यरत आहेत.

क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असणाऱ्या येडेमच्छिंद्र गावाशेजारील एक मोठी बाजारपेठ म्हणून भवानीनगर या गावाची ओळख आहे.याच गावातील महादेव वाघमारे हे एक सद्गृहस्थ!पत्नी,एक मुलगी दोन मुले असा त्यांचा परिवार! शिक्षणाचे महत्त्व जाणून त्यांनी तिन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले.एक मुलगा अमेरिकेत डॉक्टर तर दुसरा मुंबई येथे इलेक्ट्रिक इंजिनियर! एकुलती एक मुलगी अश्विनी! लहानपणापासूनच अभ्यासात हुशार व व्यवहारात चाणाक्ष!जिल्हा परिषद भवानीनगर येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयातील सर्वोत्तम विद्यार्थिनी अशी त्यांची ओळख!
लहानपणी त्यांचे बोबडे बोल व एकुलती एक मुलगी म्हणून सर्वजण त्यांना लाडाने ‘छकुली’ म्हणायचे. *छकुली हे नाव एवढे लोकप्रिय झाले की आजही त्यांना याच नावाने जास्त ओळखले जाते.अश्विनी वाघमारे (छकुली)या माध्यमिक विद्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यातील अद्वितीय बुद्धिमत्तेने शिक्षकांनाही भुरळ घातली.ही मुलगी नक्कीच पुढे महाविद्यालयाचे नाव रोशन करणार अशी सर्वांनाच त्यावेळी खात्री होती.लहानपणी छकुलीचा हट्ट की मोठी होऊन मी डॉक्टर बनणार! सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट मार्क मिळाल्यानंतर त्यांनी वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली येथे बी ए एम एस ची पदवी संपादन केली. डॉक्टर म्हणून त्यांनी पदवी मिळवताच आई-वडिलांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले. लाडकी लेक डॉक्टर झाली याचा त्यांना सार्थ अभिमान वाटू लागला. केवळ डॉक्टर म्हणून व्यवसाय करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी जोपासणारी डॉक्टर म्हणून गोरगरीब लोकांची सेवा करण्याचा त्यांनी निर्धार केला.

सुरुवातीच्या काळात त्यांनी किर्लोस्करवाडी येथे रुग्णसेवा बजावली.यानंतर त्यांचा पुणेस्थित डॉ उमेश नाईकनवरे यांच्याशी विवाह झाला. ते भाभा अणुशक्ती रीसर्च सेंटरमध्ये(B.A.R.C) मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत सुरुवातीला विवाहानंतर पती देवांचे पोस्टिंग इंदूरला झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जावे लागले.या ठिकाणीही त्यांनी रुग्नसेवा अविरतपणे सुरु ठेवली.मध्यप्रदेश राज्यात मराठी मुलीने स्वतःची छाप पाडली होती. एक गुणकारी महाराष्ट्रीयन डॉक्टर अशी त्यांची त्या ठिकाणी ओळख निर्माण झाली .इंदोर येथून पुन्हा मुंबई येथे बदली झाल्यामुळे त्या वसई विरार महानगर पालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झाल्या.गोरगरीबांच्या सेवेचे व्रत मनाशी खूणगाठ बांधल्यामुळे सरकारी डॉक्टर म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली.या संधीचे त्यांनी अक्षरशः सोने केले.गोरगरीब रुग्णांची अखंडपणे त्यांनी सेवा केली. याच वेळी त्यांच्या सुखी संसाराचा वेलू बहरला आणि त्यांना दोन फुले डोलू लागली. सासरची मंडळी त्यांना खूपच प्रेमळ लाभली. सासरच्या लोकांनी मॅडमना कधीही आई-वडिलांची आठवण येऊ दिली नाही. आई वडिलां प्रमाणे सासरच्या मंडळींनी ही त्यांच्यावर खूप प्रेम केले.
सुखी संसार सुरू असताना चीनमधून एक विषाणू जगात पसरला. भारतालाही याचा फटका बसला.भारत मार्च महिन्यापासून लॉकडाऊन झाला.या काळात त्यांच्या आयुष्यातील खरी कसोटी होती.त्यांनी मुलांना आजी-आजोबांकडे ठेवले व अहोरात्र रुग्णसेवेचा वसा जपला.सुरुवातीच्या काळात कोरोना म्हणजे केवळ जीवघेणा आजार अशीच सर्वांची भावना झाली होती. या काळात अनेकांनी पळ काढला मात्र क्रांतीसिंहाच्या भूमीतील या वाघिणीने निकराचा लढा दिला. मुंबई हा सर्वात हॉटस्पॉट एरिया! या ठिकाणी भारतात सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण! परदेश वारी करणारे तर जास्तच! चिनसह संपूर्ण जगभरातून प्रवाशांची याठिकाणी रेलचेल होती.मात्र अश्विनी मॅडम यांनी त्यांच्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करत परदेशी रुग्णांची तपासणी केली.चीनसह इतर देशातील जवळपास 250 रुग्ण त्यांनी तपासले.सर्वांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.न भिता न डगमगता या परिस्थितीला सामोरे गेल्या.
सलग सोळा-सोळा तास त्यांनी रुग्णसेवा बजावत आहेत.’कोरोना योद्धा’ ‘कोरोना फायटर’ ही विशेषने ही त्यांना अपुरी पडतील एवढे अद्वितीय काम त्यांनी केले आहे.जवळपास ५ महिने त्यांनी स्वतःच्या मुलांचे चेहरे पाहिलेले नाहीत.आजही त्या पूर्वीच्याच जोमाने कार्यरत आहेत.महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून त्या कार्यरत आहेत.









































































