Last Updated on 12 Nov 2024 8:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महायुती सरकारने मुलींना मोफत शिक्षण दिले. शेतकऱ्यांचे शेतीचे वीजबिल माफ केले. आता तर सरकारने दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधक अनेक वर्षे अर्थमंत्री होते. मग त्यांना या योजना आणण्याचा शहाणपणा का सुचला नाही. हे देणारे सरकार आहे, घेणारे नाही. त्यांनी फक्त आजपर्यत संस्था लाटल्या. त्यांना ज्यांनी ओव्हरटेक केलं, त्यांना त्यांनी राजकीय दृष्टीने संपवल. शेतकरी दर मागायला गेल्यावर त्यांच्यावर गुंड घातले. मारहाण केल्या. त्यामुळे ही हुकूमशाही प्रवृत्ती या निवडणुकीत हद्दपार करण्यासाठी मला आशीर्वाद द्या, असे आवाहन निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
बागणी (ता.वाळवा) प्रचार सभेत ते बोलत होते.रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत, पृथ्वीराज पवार, प्रसाद पाटील, निवास पाटील, अमोल पाटील, लालासाहेब पाटील, उपसरपंच संतोष घनवट, बबनदादा शिंदे, सूरज घनवट, संजय चव्हाण, बबन पाटील, संभाजी चौगुले, दीपक शेळके प्रमुख उपस्थित होते.
सागर खोत म्हणाले, एकास एक लढतीमुळे यंदा विरोधकांचा समतोल ढासळू लागला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गुंडगिरीची भाषा येऊ लागली आहे. आपल्याच उसाचे ७०० रुपये हाणून आजपर्यंत हा कारखानदारांचा मोहरक्या आपल्यावर अन्याय करत आला आहे. त्यामुळे आपलेच हाणून आपलेला गंडा लावणाऱ्याला २० तारखेला चुना लावल्याशिवाय सोडायच नाय
सागर खोत म्हणाले, रिकव्हरी कमी असून ही ना.अजितदादा पवार यांचा साखर कारखाना ३६३६ रुपये दर देतो. तर दुसरीकडे रिकव्हरी जास्त असून ही विरोधकांचा साखर कारखाना ३१०० रुपये दर देत आहे. अजितदादांना दर द्यायला परवडतो, मग यांना का परवडत नाही. हा महाशय टनाला शेतकऱ्यांचे ७०० रुपये हाणतोय आणि तुम्ही लोक त्याला प्रचाराला हलग्या लावून वाजत आणताय. तुम्हाला लुटणाऱ्याला धडा शिकवण्याची तुमच्यात का हिंमत नाय. मला या गावचा अनुभव हाय. एकदा बागणीकरांनी ठरवलं तर ते हिसका दाखवल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे. आजपर्यंत तुम्ही लय सोसलय, आता सोसायच नाय. ऊस बिलातून तुमचे कोट्यवधी रुपये लुटणाऱ्याला या निवडणुकीत खऱ्या अर्थाने घरी बसवा व निशिकांतदादांसारखा स्वाभिमानी आमदार आपले प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत पाठवा.
यावेळी नितीन शिंदे, महादेव सिद्द, तानाजी माने, आनंदा सावंत, दिलीप बामणे, हमीद सुतार, महेश माने, महेश सुतार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जबाजारी म्हणून तालुक्याची ओळख…
तालुक्यातील तरुणांना रोजगार नाही. शेतकऱ्यांच्या उसाला दर नाही. शेतकरी कर्ज काढून पिके घेतो. पण हे कारखानदार त्यांच्या उसाला योग्य दर देत नाहीत. त्यांची लुबाडणूक करतात. त्यामुळे येथील शेतकरी कर्जबाजारी बनला आहे. त्यात सांगली जिल्ह्यामध्ये कर्जबाजारी तालुका म्हणून आपल्या वाळवा तालुक्याचा नंबर लागतो, हे आपल्या दृष्टीने दुर्देवी आहे. मग हाच म्हणायचा का तो ३५ वर्षातील अकार्यक्षम आमदारांचा विकास, अशी टीका ही निशिकांत भोसले-पाटील यांनी यावेळी केला.








































































