Last Updated on 16 May 2025 1:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा व शिराळा या दोन्ही तालुक्यांतील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता, या भागासाठी स्वतंत्र उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्थापना करावी याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी सोबत आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते.
सध्या नागरिकांना वाहन नोंदणी, परवाने, तसेच अन्य वाहतूकसंबंधी कामांसाठी सांगली जिल्हा मुख्यालय गाठावे लागते, जे सुमारे ७०-८० किमी अंतरावर आहे. वाळवा व शिराळा तालुक्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ८ लाखांहून अधिक असून, केवळ इस्लामपूर शहरातच जवळपास १ लाख नागरिक वास्तव्यास आहेत. या पार्श्वभूमीवर, इस्लामपूर येथे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन केल्यास या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल.
म्हणूनच वाळवा शिराळा या दोन्ही तालुक्यातील लोकांचा वेळ, प्रवासाचा खर्च वाचावा आणि प्रशासनाचे कार्य देखील अधिक सुलभ व्हावे म्हणुन इस्लामपूर येथे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे, यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यास मुख्यमंत्री महोदयांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.








































































