Last Updated on 28 Mar 2026 10:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
३ कोटींचा बहुउद्देशीय सभामंडप, आ. जयंत पाटील यांचा पुढाकार
सांगली ।
वाळवा तालुक्यातील निसर्गरम्य आणि धार्मिक महत्व असलेल्या श्री रामलिंग बेटाच्या विकासाला आता आणखी एक मोठी जोड मिळणार आहे. भाविक आणि पर्यटकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करत बेटावर सुमारे ३ कोटी रुपयांच्या निधीतून बहुउद्देशीय सभामंडप लवकरच साकारणार आहे. आ. जयंत पाटील यांचे विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता.
बेटावर वर्षभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र, मोठ्या कार्यक्रमांसाठी सक्षम आणि संरक्षित जागेचा अभाव जाणवत होता. हीच गरज लक्षात घेऊन प्रस्तावित सभामंडपाची उभारणी केली जाणार असून, त्यामुळे भविष्यातील सर्व मोठ्या कार्यक्रमांना एक सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
सुमारे २० मीटर लांबी आणि १४.५ मीटर रुंदीच्या प्रशस्त जागेत उभा राहणारा हा सभामंडप शेकडो भाविकांची एकावेळी बैठक व्यवस्था सहज करू शकेल. मुख्य सभागृहात उभारण्यात येणारा उंचावरील रंगमंच (स्टेज एरिया) कार्यक्रमांचे सादरीकरण प्रभावी करण्यास मदत करणार आहे. शेवटच्या रांगेतील व्यक्तीलाही कार्यक्रम स्पष्ट दिसेल, यासाठी विशेष रचना करण्यात आली आहे.

संकल्पचित्र
सुविधांच्या दृष्टीनेही या प्रकल्पात बारकाईने नियोजन करण्यात आले आहे. वृद्ध आणि दिव्यांगांसाठी प्रवेशद्वाराजवळ उतारमार्ग (एंट्री रॅम्प), स्वागत कक्ष (एंट्री फोयर), तसेच गर्दीच्या वेळी सुलभ हालचालीसाठी तीन बाजूंनी प्रवेशद्वारे असणार आहेत. नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा यांचा पुरेपूर वापर होईल, अशा पद्धतीने संपूर्ण वास्तूची रचना केली जात आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोयही या आराखड्यात समाविष्ट आहे.
रामलिंग बेटाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या सभामंडपाचा बाह्य दर्शनी भाग (एलिव्हेशन) विशेष आकर्षक ठेवण्यात येणार असून, बेटाच्या पर्यटन मूल्याला आणखी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आ. जयंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आधीच घाट बांधणी, रस्ते, सुशोभीकरण यांसारख्या कामांमुळे बेटाचा चेहरामोहरा बदलत असताना, या नव्या सभामंडपामुळे बहेच्या पर्यटन आणि धार्मिक विकासाला गती मिळणार आहेत. भाविकांसाठी ही सुविधा म्हणजे केवळ इमारत नसून, भविष्यातील मोठ्या धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र ठरणार आहे.












































































