Last Updated on 31 Mar 2026 1:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या मुंबई येथील सांगली वैभव को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (मुंबई बँक) यांनी पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात सांगली वैभव सोसायटी आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांची संयुक्त सभा नवी मुंबईतील वाशी येथील दैवज्ञ भवन सभागृहात पार पडली. यावेळी मुंबई बँकेच्या वतीने अधिकृतपणे पालकत्व स्वीकारल्याची माहिती देण्यात आली. या सभेला मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा बृहन्मुंबई पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव नलावडे, सांगली वैभवचे अध्यक्ष डॉ पी.आर. पाटील, उपाध्यक्ष बी. टी. पाटील, सरव्यवस्थापक सुभाष विचारे, मुंबई बँकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक नितीन बनकर, संचालक विष्णू घुमरे आणि मुख्य सरव्यवस्थापक एस. सी. सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेच्या पुढील वाटचालीचा आराखडा स्पष्ट करण्यात आला.
सन १९८१ मध्ये स्थापन झालेल्या सांगली वैभव संस्थेचे कार्यक्षेत्र मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर अशा सात जिल्ह्यांत विस्तारलेले आहे. सुमारे ६२५ कोटी रुपयांचे खेळते भांडवल आणि ३८ शाखांचे विस्तीर्ण जाळे आहे. सभेला संबोधित करताना शिवाजीराव नलावडे यांनी स्पष्ट केले की, संस्थेला अडचणीतून बाहेर काढून पूर्वस्थितीत आणण्यासाठी मुंबई बँक पूर्णपणे खंबीरपणे पाठीशी उभी आहे.
या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सभासदांमध्ये असलेली संभ्रमावस्था आता दूर झाली आहे. मुंबई बँकेच्या पालकत्वामुळे संस्थेची कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार असून, आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांना दर्जेदार सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. अनुभवी कर्मचारी आणि निष्ठावान सभासद ही सांगली वैभवची खरी ताकद असून, या नव्या सहकार्यामुळे संस्था आता नव्या जोमाने झेप घेण्यास सज्ज झाली असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.












































































