Last Updated on 24 Feb 2026 9:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
महाज्योती मार्फत राबविण्यात येणारे सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून कोणताही कार्यक्रम ठप्प नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करून काही प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रकल्प संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
महाज्योतीकडून एकूण 11 प्रकारचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. त्यापैकी संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) चे राज्यसेवा व संयुक्त गट ब व क तसेच मिलिटरी भरती प्रशिक्षण या स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येत आहे. त्यातील संघ लोकसेवा आयोग प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह रुपये 13 हजार विद्यावेतन, एकवेळ रुपये 18 हजार आकस्मिक निधी प्रदान करण्यात येतो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे राज्यसेवा व संयुक्त गट-ब व क तसेच मिलिटरी भरती प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रतिमाह रुपये 10 हजार विद्यावेतन, एकवेळ रुपये 12 हजार आकस्मिक निधी प्रदान करण्यात येतो. त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नसून विद्यावेतन, आकस्मिक निधी नियमित चालू राहणार आहे.
2025-26 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा प्रशिक्षणातून 298, कर्मचारी निवड आयोग प्रशिक्षणात 499, मिलिटरी भरती प्रशिक्षणात 1500, एमबीए सीएटी/सीएमएटी-सीईटी प्रशिक्षणात 1500, यूजीसी एनईटी/सीएसआयआर/एमएच-एसईटी प्रशिक्षणात 1200 तर यूपीएससी प्रशिक्षणात 400, एमपीएससी गट ब व क मध्ये 400, एमपीएससी राज्यसेवा प्रशिक्षणात 300 तर जेईई, एनईईटी-एमएच-सीईटीप्रशिक्षणात 3500 विद्यार्थ्यांना आतापर्यंत लाभ देण्यात आलेला आहे.
या शिवाय आयबीपीएस पीओ/ बँकिंग / रेल्वे प्रशिक्षण, कर्मचारी निवड आयोग (एसएससी), रेल्वे भरती (आरआरबी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अभियांत्रिकी सेवा या परीक्षांचे स्वरूपच ऑनलाईन पद्धतीने असल्याने सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने 2026-27 या आर्थिक वर्षापासून राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. या विद्यार्थ्यांना घरूनच प्रशिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्याने निवास-भोजन व्यवस्था व्हावी या हेतूने देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाऐवजी टॅबलेट तसेच डेटा सीम देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात देण्याबाबत विद्यार्थ्यांनी अनेकवेळा महाज्योती कार्यालयाकडे मागणी केलेली होती. तसेच मार्च, 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रशिक्षण ऑनलाईन करण्याबाबत विधानपरिषदेत चर्चा देखील झालेली आहे. महाज्योतीकडे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी 44,903 अर्ज प्राप्त झालेले असून त्यातील एमपीएससी अभियांत्रिकी प्रशिक्षणासाठी 4,839, एस.एस.सी. प्रशिक्षणासाठी 14,447बँकिंग/रेल्वे/एलआयसी करिता 18,265 तर आरआरबीप्रशिक्षणासाठी ७,३५२ अर्ज प्राप्त झालेले आहे. यावरून विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्वरूपात प्रशिक्षण देण्यासाठी मागणी असल्याचे दिसून येते.
जेईई/एनईईटी/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण हे ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना २०२१ पासून ऑनलाईन स्वरूपात देण्यात येत आहे. सदरचे विद्यार्थी हे महाविद्यालयात शिक्षण घेत हे प्रशिक्षण घेत असल्याने त्यांना एका ठिकाणी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सोडून प्रशिक्षणासाठी आणणे उचित होणार नसल्याने त्यांचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी ४१८०३ विद्यार्थ्यांनी महाज्योती संस्थेकडे अर्ज केलेले होते. यावरून विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रशिक्षांसाठी मागणी असल्याचे दिसून येते.
विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या टॅबलेटचा बॅटरी बॅकअप चांगला असल्याने एकदा चार्ज केल्यावर किमान 12 तास त्याचा वापर करता येणार आहे. त्यामुळे वीज खंडित झाल्यावरही शिक्षणात खंड पडणार नाही. या शिवाय विद्यार्थ्यांना या आधी केवळ एअरटेल व व्हिआय या दोनच कंपन्यांचे सीम देण्यात येत होते, मात्र विद्यार्थ्यांना आता त्यांच्या गावात ज्या सीमचे नेटवर्क आहे ते सीम घेण्याची मुभा देण्यात आलेली असून त्यामुळे इंटरनेट सुविधेचाही प्रश्न सुटणार आहे.
अनेक होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे पार्ट टाईम जॉब करावा लागतो तसेच अनेक गृहिणींना देखील घरकामामुळे पुणे किंवा इतर शहरात येऊन प्रशिक्षणाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे अशा होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ मिळावा हा प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात देण्याचा महत्वाचा हेतू आहे.
ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना लाईव्ह मार्गदर्शन होणार असून त्यांचे शंका निरसन देखील त्यात करण्यात येणार आहे. याशिवाय दर आठवड्याला परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या शिवाय प्रशिक्षणासाठी आवश्यक नोट्स व पुस्तके ही देखील पीडीएफ स्वरूपात विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता त्यांना अत्याधुनिक पद्धतीने दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा महाज्योतीचा मानस आहे. तसेच महाज्योतीकडे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी 44,903 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. यावरून ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे दिसून येते.
वरील सर्व वस्तुस्थिती विचारात घेता, कोणतेही प्रशिक्षण कार्यक्रम ठप्प नसून चालू आर्थिक वर्षात प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झालेले असून विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करता तसेच प्रशिक्षणाबाबत सर्वांगीण विचार करूनच ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.










































































