Last Updated on 02 Apr 2026 8:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कराड ।
ऊस उत्पादक, ऊस तोडणी वाहतूकदार व कामगार हे तीन प्रमुख घटक आहेत. सर्वांच्या सहकार्यामुळे कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी पार पडला आहे. कृष्णा कारखान्याने तोडणी वाहतूक यंत्रणेचा अधिक कार्यक्षम आणि नियोजनाबद्ध वापर केला आहे; जो संपूर्ण साखर कारखानदारीसाठी एक आदर्श ठरला आहे. ऊस तोडणी वाहतूकदारांनी येत्या गळीत हंगामातही चांगला व्यवसाय करावा. तसेच शेतकऱ्यांना सहकार्य करावे. येणारा गळीत हंगाम आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडायचा आहे, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
शिवनगर येथे कारखान्याच्या सन २०२६-२७ या आगामी गळीत हंगामाकरिता ऊसतोडणी वाहतूक करारांचा प्रारंभ डॉ. सुरेश भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित ऊसतोडणी वाहतूकदारांना अधिकृत करारपत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी संचालक लिंबाजी पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे.डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी.एन.देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, पंचायत समिती सदस्य मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा – कृष्णा आर्थिक परिवाराचा ३,१०९ कोटींचा एकूण व्यवसाय
मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार म्हणाले, गळीत हंगामाच्या दृष्टीने ऑफ सीझनची कामे सुरू आहेत. तसेच गळीत हंगामांसाठी सर्व तोडणी करार करण्यात येत आहेत. दरम्यान, कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे यांची दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेच्या व्हाईस प्रेसिडेंटपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सर्व अधिकारी, ऊसतोडणी वाहतूकदार व कंत्राटदार, गट अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








































































