Last Updated on 26 Mar 2026 6:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
निवडणुकीचे दिवस जवळ आले की वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. सभांचा गडगडाट, बॅनरबाजी, भाषणांचा पाऊस आणि आश्वासनांची आतषबाजी सगळं काही अचानक वाढतं. कालपर्यंत शांत असलेली राजकीय समीकरणं अचानक जिवंत होतात आणि प्रत्येक नेत्याच्या तोंडी एकच शब्द असतो…विकास!
पण या सगळ्या गदारोळात सामान्य माणूस मात्र शांतपणे पाहत असतो. कारण त्याने हे दृश्य नवीन पाहिलेलं नसतं. प्रत्येक निवडणुकीत तोच खेळ, तेच शब्द, तीच आश्वासनं… आणि शेवटी तोच निराशेचा अनुभव. म्हणूनच आता गावागावात एकच म्हण पुन्हा ऐकू येऊ लागली आहे…
“लबाडा घरचं अवतान, जेवल्याशिवाय खरं नाही!”
निवडणुकीच्या तोंडावर रस्ते, पाणी, वीज आणि रोजगाराचे प्रश्न एका रात्रीत सुटतील, असे चित्र रंगवले जाते. आश्वासनांच्या या मांदियाळीत सामान्य मतदार मात्र चक्रावून जातो. आश्वासनं ऐकायला गोड असतात, पण ती पोट भरत नाहीत. केवळ भाषणातला विकास आणि कागदावरच्या योजना या आता लोकांना फसवू शकत नाहीत.
मतदार आता बदललाय. तो केवळ टाळ्या वाजवणारा श्रोता राहिलेला नाही, तर तो निरीक्षक बनलाय. तो पाहतोय, मोजतोय आणि लक्षात ठेवतोय. कोण कधी आला, काय बोलला आणि त्यातून काय केलं याचा हिशोब आता त्याच्या मनात साठत चाललाय.
निवडणुकीच्या आधी अचानक सगळे प्रश्न सुटतील, अशी जी चित्रं रंगवली जातात, ती आता फार काळ टिकत नाहीत. कारण लोकांना माहित आहे की, निवडणूक संपली की हीच आश्वासनं हळूहळू गायब होतात. शब्दांची झगमगाट ओसरते आणि वास्तव पुन्हा तसंच उघडं पडतं.
म्हणूनच आता मतदार मनाशी एक वेगळाच निर्णय घेतोय. तो म्हणतोय, “आम्हाला अवतान नको, आम्हाला जेवण पाहिजे.” म्हणजेच आश्वासनं नव्हे, तर प्रत्यक्ष काम!
थर्ड अंपायर म्हणून जनतेचा निर्णयही आता बदलत चाललाय. जो काम करेल, तोच टिकेल. जो फक्त बोलेल, तो बाहेर जाईल.
कारण शेवटी, लोकशाहीत शब्दांना नव्हे…कृतीला मत मिळतं!
– थर्ड अंपायर








































































