Last Updated on 06 Mar 2026 1:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून, तेलंगणाच्या राज्यपालपदाची जबाबदारी आता शिव प्रताप शुक्ला यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली आहे. जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी आणि त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेल्या वर्मा यांनी २०१८ ते २०२३ या कालावधीत त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्याकडे वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकासासारख्या महत्त्वाच्या खात्यांचा अनुभव आहे. त्रिपुराच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय राहिलेल्या वर्मा यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला एक अनुभवी प्रशासकीय नेतृत्व मिळाले आहे. आता ते देशातील एक महत्त्वाचे आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध राज्य असलेल्या महाराष्ट्राचे संवैधानिक प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारतील.
जिष्णू देव वर्मा यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५७ रोजी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील राजघराण्यात झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि १९९० च्या दशकात भाजपमध्ये सामील होऊन त्यांनी सक्रिय राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
ज्या काळात त्रिपुरामध्ये डाव्या विचारसरणीच्या पक्षांचे वर्चस्व होते, त्या काळात जिष्णू देव वर्मा यांनी भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी दिवसरात्र काम केले, राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला. त्यांनी १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये त्रिपुरा पूर्व लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवली आणि राज्यात पक्षाचा पाया मजबूत केला.
जिष्णू देव वर्मा हे केवळ एक अनुभवी राजकारणी नसून ते एक संवेदनशील कवी, चित्रकार आणि शिल्पकार देखील आहेत. त्यांनी ‘चिल्ड्रन ऑफ द वॉटर गॉडेस’ आणि ‘मास्टर ऑफ टाइम’ यांसारखी गाजलेली पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या या साहित्यिक आणि कलात्मक आवडीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे.








































































