Last Updated on 02 Mar 2026 2:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ॲड. धैर्यशील पाटील यांच्या हस्ते होणार युवा संसदेचे उद्घाटन
ईश्वरपूर।
युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय (भारत सरकार), ‘मेरा युवा भारत’ सांगली आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक ४ मार्च २०२६ रोजी ईश्वरपूर येथे जिल्हास्तरीय विकसित भारत युथ पार्लमेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या युवा संसदेचे उद्घाटन वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यामध्ये होणार आहे.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन होत आहे. या युथ पार्लमेंटसाठी ‘आणीबाणीची ५० वर्षे: भारतीय लोकशाहीसाठी धडे’ हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठेवण्यात आला आहे. युवकांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे, जबाबदार नागरिकत्व आणि नेतृत्वगुणांचा विकास करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
संसदेत नेतृत्व करण्याची संधी
या जिल्हास्तरीय स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील १८ ते २५ वयोगटातील नोंदणीकृत युवक सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. या स्पर्धेतून ५ उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय फेरीसाठी (विधानसभा) केली जाणार आहे. राज्यस्तरावर चमकणारे ३ निवडक विद्यार्थी नवी दिल्ली येथील भारतीय संसदेत महाराष्ट्राचे नेतृत्व करतील, अशी माहिती NSS कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. गोरखनाथ किर्दत यांनी दिली.
या उपक्रमाद्वारे युवकांना राष्ट्रीय विषयांवर सजग आणि उत्तरदायी नागरिक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या चर्चासत्रातील विचारमंथनातून भारतीय लोकशाहीतील महत्त्वाचे टप्पे अधोरेखित होणार आहेत.








































































