Last Updated on 17 Feb 2026 7:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
राष्ट्रीय महामार्ग आता केवळ वाहनांच्या वेगासाठीच नव्हे, तर निसर्गाच्या रक्षणासाठीही ओळखले जाणार आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘बी कॉरिडॉर’ (Bee Corridor) विकसित करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत महामार्गांच्या दुतर्फा केवळ शोभेची झाडे न लावता, मधमाश्यांना अनुकूल असलेल्या स्थानिक झाडांची लागवड केली जाणार आहे.
मधमाश्या आणि इतर परागीभवन करणाऱ्या कीटकांची संख्या सध्या घटत चालली आहे, ज्याचा थेट परिणाम शेती आणि फळबागांच्या उत्पादकतेवर होत आहे. ही समस्या ओळखून NHAI ने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये:
२४ लाख झाडांची लागवड: २०२६-२७ या वर्षात एकूण ४० लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, त्यातील ६० टक्के म्हणजेच सुमारे २४ लाख झाडे केवळ ‘बी कॉरिडॉर’ अंतर्गत लावली जातील.
स्थानिक प्रजातींना प्राधान्य: कडुनिंब, करंज, मोह, पळस, जांभूळ आणि सिरीस यांसारखी वर्षभर फुलांचा बहर देणारी झाडे लावली जाणार आहेत.
निसर्गचक्र टिकणार: महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या रिकाम्या जमिनीवर ही झाडे लावली जातील, ज्यामुळे वर्षभर मधमाश्यांना मध आणि परागकण उपलब्ध होतील.
पहिली सुरुवात: सुरुवातीच्या टप्प्यात NHAI ची क्षेत्रीय कार्यालये अशा किमान तीन जागांवर ही योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवणार आहेत.
या ‘बी कॉरिडॉर’मुळे केवळ पर्यावरण संतुलित राहणार नाही, तर महामार्गालगतच्या शेतीलाही परागीभवन क्रियेमुळे मोठा फायदा होणार आहे. पर्यावरणाप्रती NHAI ची ही वचनबद्धता महामार्गांना ‘ग्रीन कॉरिडॉर’ बनवण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.








































































