Last Updated on 17 Feb 2026 8:49 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे हे शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर काढण्यासाठी रामबाण उपाय मानले जाते. ‘उष:पान’ असेही याला आयुर्वेदामध्ये संबोधले जाते. मात्र, चुकीच्या पद्धतीने केलेल्या या कृतीमुळे आरोग्याचे फायदे मिळण्याऐवजी मोठे नुकसान होऊ शकते. जाणून घ्या, सकाळी पाणी पिताना कोणत्या गोष्टींचे पालन करणे अनिवार्य आहे.
अनेकजण आरोग्यासाठी सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पाणी पिण्याला प्राधान्य देतात. वजन कमी करणे, पचन सुधारणे आणि त्वचेसाठी हे फायदेशीर मानले जाते. मात्र, हे पाणी पिण्याची पद्धत चुकीची असेल, तर त्याचे गंभीर परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात.
१. उभे राहून पाणी पिण्याचे धोके : बहुतेक लोक घाईघाईत उभे राहून पाणी पितात. शास्त्रानुसार, जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो, तेव्हा ते अन्ननलिकेतून वेगाने खाली उतरते. यामुळे पोटाच्या खालच्या भिंतीवर आणि किडनीवर मोठा दाब पडतो. दीर्घकाळ असे केल्यास शरीरातील हाडे ठिसूळ होऊन सांधेदुखीचा (Gout/Arthritis) त्रास सुरू होतो.
२. पाण्याचे तापमान महत्त्वाचे : सकाळी उठल्याबरोबर फ्रीजमधील थंड पाणी पिणे म्हणजे पचनसंस्थेला धक्का देण्यासारखे आहे. यामुळे आतड्यांचे कार्य मंदावते आणि बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होऊ शकतो. त्याऐवजी कोमट पाणी प्यायल्यास चरबी जळण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण सुधारते.
३. ‘लाळ’ का आहे महत्त्वाची? सकाळी आपल्या तोंडात जी लाळ (Saliva) जमा झालेली असते, ती ‘अल्कलाईन’ (Alkaline) असते. जेव्हा आपण हळूहळू घोट घोट पाणी पितो, तेव्हा ही लाळ पोटात जाते आणि पोटातील ‘ॲसिड’ला संतुलित करते. यामुळे पित्त, गॅस आणि अपचनाच्या समस्या कायमच्या दूर होतात.
४. ब्रश करण्यापूर्वी की नंतर? अनेकांना प्रश्न असतो की पाणी कधी प्यावे? आयुर्वेदानुसार, ब्रश करण्यापूर्वीच पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. रात्रभर तोंडात जमा झालेले आरोग्यदायी बॅक्टेरिया पोटात गेल्यामुळे पचनशक्ती अधिक कार्यक्षम होते.
(Disclaimer : यामध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा कोणत्याही नियमाचे पालन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)








































































