Last Updated on 20 Dec 2025 3:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2026) बीसीसीआयने (BCCI) आज १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीने या संघात काही अत्यंत धाडसी निर्णय घेतले असून, युवा खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवला आहे. अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे, मात्र उपकर्णधारपदाबाबत मोठा बदल करण्यात आला आहे.

शुभमन गिलचा पत्ता कट, अक्षर पटेलवर मोठी जबाबदारी : या संघ निवडीतील सर्वात मोठा धक्का म्हणजे सलामीवीर शुभमन गिल याला संघात स्थान मिळालेले नाही. गेल्या काही काळातील त्याचा ढासळलेला फॉर्म याला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. गिलच्या अनुपस्थितीत अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला बढती देऊन संघाचा नवा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
युवा रक्ताला प्राधान्य : यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसनसोबत ईशान किशनला पुन्हा संधी देण्यात आली आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत चमकलेल्या अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी संघात आपले स्थान पक्के केले आहे. ‘फिनिशर’ म्हणून रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांच्यावर जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
इशान किशनचे पुनरागमन, जितेश शर्माचा पत्ता कट
यष्टीरक्षकाच्या भूमिकेसाठी निवड समितीने मोठा बदल केला आहे. गेल्या काही मालिकांमध्ये संधी मिळालेल्या जितेश शर्माला खराब फॉर्ममुळे वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी घरगुती आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या इशान किशनला पुन्हा संघात स्थान मिळाले आहे. संजू सॅमसनच्या रूपाने संघात दुसरा यष्टीरक्षक पर्याय उपलब्ध आहे.
गोलंदाजीची धुरा बुमराहच्या खांद्यावर
भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व अनुभवी जसप्रीत बुमराह करेल, तर त्याला अर्शदीप सिंग आणि युवा हर्षित राणा साथ देतील. फिरकी विभागात कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांची ‘मिस्ट्री’ जोडी प्रतिस्पर्धी संघासमोर मोठे आव्हान उभे करेल.
अशी आहे भारताची ‘ब्लूप्रिंट’ (१५ सदस्यीय संघ) : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा.
राखीव खेळाडू : रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा आणि रियान पराग.








































































