थोडक्यात पण महत्वाचे…!
- राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार
- अंतिम निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासन घेणार
- पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक
- कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी शासनाची भूमिका
मुंबई ।
राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते बारावी असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. तसंच निर्णयाचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असतील असेही स्पष्ट केले आहे.
शाळा सुरू करत असताना संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन आणि काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात याव्यात. ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास संमती देतील असे विद्यार्थी शाळेत येतील.शिक्षण कुणाचेही थांबू नये अशी आमचा प्रयत्न आहे असेही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “२४ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. बालवाडी ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे”.विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळा- महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे.
शासनाने शाळा, महाविद्यालये बंद न करता कोरोनाच्या नियमावलीची अंमलबजावणी करुन ज्ञानदान सुरु ठेवले पाहिजे. शिक्षक- विद्यार्थ्यांमध्ये समोरासमोर ज्ञानाची देवाण घेवाण झाल्यास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन व जिल्हा प्रशासनाने समन्वयात्मक भूमिकेतून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांमधून करण्यात आली होती.
शाळा सुरू करताना सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाबरोबरच शाळा व्यवस्थापनाने प्रयत्न करावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.