चित्तथरारक लढतीत इंग्लंडला नमवत न्यूझीलंड फायनलमध्ये
अबुधाबी ।
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात झाला.अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ५ गड्यांची विजय मिळवला.यासह न्यूझीलंडने टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १६६ धावा केल्या. डेव्हिड मलान आणि मोईन अली यांनी केलेल्या उपयुक्त खेळींमुळे इंग्लंडने २० षटकात ४ बाद १६६ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान होते. हे आव्हान न्यूझीलंडने १९ षटकांत ५ विकेट्स गमावत पूर्ण केले. अर्धशतकी खेळी करणाऱ्या डॅरेल मिचेलने विजयी चौकारासह न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद 72 धावा ठोकणारा डॅरेल मिचेल हिरो ठरला आहे.मिचेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
चुरशीच्या झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा संघ एका क्षणी सामना जिंकेल असेच वाटत होते. पण शेवटच्या काही षटकात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत विजय आपल्या नावे केला आहे.
दुसरी सेमीफायनलची मॅच उद्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडणार आहे. संघातील विजेत्या संघासोबत 14 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड अंतिम सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळेल.