सांगली । आजच्या युगात मुले संवेदनाशून्य होत चाललेली आहेत.त्यांच्यावर वेळीच योग्य ते संस्कार होणे गरजेचे आहे. आपणही कधीतरी वृध्द होणार आहोत याची जाणीव होणे आवश्यक आहे.त्यासाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.आधार वृध्दाश्रम, आष्टा भेट उपक्रमांमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक शिंदे बोलत होते.
पुढे असेही ते म्हणले,असे उपक्रम राबविणे हे अतिशय स्तुत्य प्रिय आहे.कारण मुलांना यातून समाजामध्ये पीडित व्यक्तींच्या व्यथा समजून घेता येतात. मुलांना याची जाणीव होते.त्यामुळे नक्कीच मुलांमध्ये सकारात्मक बदल होईल .आणि एक सहकार्याची भावना,समजून घेण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये वाढीस लागेल.
मूल्यशिक्षण काळाची गरज आहे.ते विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनण्यास मदत करते त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्यासही मदत होते.असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. डॉ. किर्दत यांनी या भेटीच्या वेळी केले.
प्रा.स्वाती चव्हाण यांच्या कल्पनेतून पुढे आलेले असे उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांमध्ये आदर,सहिष्णुता, करुणा, सहानुभूती यांसारख्या गुणांची वाढ होते.विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाबरोबरच भावनिक,सामाजिक विकास साधण्यास मदत होते.असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी सहभागी मुलांनी भेटीच्या वेळी वृद्धांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच वृद्धाश्रमाचे काम कसे चालते,वृद्धांची काळजी कशी घेतली जाते पीडित व्यक्ती याठिकाणी कसे येतात याविषयी माहिती दिली.
आश्रमाचे प्रमुख श्री व सौ. सर्जेराव जाधव यांसारखी मोठ्या मनाची ,सेवाभावी वृतीची माणसे समाजात असल्याने या पीडित व्यक्तींची सेवा करण्याचे भाग्य लाभते असे तेथील कर्मचारी सौ.लोंढे यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एम.जाधव यांचे सहकार्य मिळाले.त्याचबरोबर वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव ॲड. बी. एस. पाटील (अण्णा) यांची प्रेरणा तर सहसचिव ॲड.धैर्यशील पाटील (बाबा) यांचे सतत मार्गदर्शन लाभते.









































































