मुलींच्या शिक्षणाला मिळाला संवेदनशीलतेचा आधार..!
जळगाव | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जळगाव सीमेवरील निंभोरा-शांततेचे नंदनवन… पण एका धैर्यशील विद्यार्थिनीच्या पत्रामुळे हे गाव आज सामाजिक जाणिवेचे प्रतीक ठरले आहे. या गावाजवळील शेतात राहणारी जान्हवी सोपान महाजन-शेतमजुरीच्या कुशीत उच्च शिक्षणाची तेजस्वी स्वप्ने उराशी बाळगणारी कन्या-दररोज जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याच्या महाविद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करत होती.
शेताच्या बांधावरून लालपरी वेगाने धावायची… पण त्या ठिकाणी थांबा नसल्याने जान्हवीला गावातील बसस्थानक गाठावे लागे. अनेकदा बस निसटायची, आणि तिच्या डोळ्यांत आशेऐवजी निराशेचे पाणी साचायचे. शेतीच्या मातीत राबणाऱ्या हातांमध्ये शिक्षणाची कलम पकडलेली ही मुलगी मात्र थांबली नाही. तिने थेट आपल्या व्यथेचा आवाज पत्रातून परिवहन मंत्री मा. प्रतापराव सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचवला शेताजवळ थांबा मिळावा आणि बससेवा वाढवावी, अशी कळकळीची मागणी केली.
हे पत्र मंत्र्यांच्या संवेदनशील मनाला स्पर्शन गेले. तत्काळ एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) श्री. नितीन मैंद यांच्या मार्फत छत्रपती संभाजीनगर व जळगाव विभाग नियंत्रकांना स्पष्ट आदेश देण्यात आले. या विद्यार्थिनीच्या शैक्षणिक भवितव्याला पूर्ण सहकार्य करावे. आदेश मिळताच जळगाव विभाग नियंत्रक श्री. दिलीप बंजारा यांनी पाचोरा आगार व्यवस्थापक श्री. प्रकाश पाटील यांना आवश्यक सूचना दिल्या.
एसटी अधिकाऱ्यांनी थेट तिच्या महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांसमक्ष जान्हवीशी संवाद साधला, तर पुढे थेट तिच्या शेतावर जाऊन कुटुंबीयांशी भेट घेतली. अचानक शेताच्या बांधावर पोहोचलेल्या एसटी अधिकाऱ्यांना पाहून हे शेतकरी कुटुंब आश्चर्यचकित झाले. विद्यार्थिनीची अडचण समजून घेताच त्वरित निर्णय झाला. आता लालपरी थेट शेताच्या बांधावर थांबणार! आज त्या ठिकाणी येण्या-जाणाऱ्या बसेस थांबू लागल्या आहेत. शेतीच्या माळावर आता केवळ पीकच नाही, तर एका मुलीच्या शिक्षणाच्या स्वप्नांची पेरणीही यशस्वी झाली आहे. एका सर्वसामान्य विद्यार्थिनीच्या पत्रातून उभा राहिलेला हा बदल परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या संवेदनशील नेतृत्वाचा जिवंत दाखला ठरला आहे.
या निर्णयाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून, “शब्दांना कान देणारा मंत्री आणि स्वप्नांना थांबा देणारी लालपरी” अशी भावना जनमानसात दाटून येत आहे.









































































