Last Updated on 04 Nov 2025 9:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नामकरणाची घोषणा होताच शहरात मोठा जल्लोष
सांगली । इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामांतर आणि इस्लामपूर नगरपरिषदेचे “उरुण ईश्वरपूर नगरपरिषद” असे नामकरण करण्याबाबतचे अधिकृत शासन परिपत्रक जाहीर झाले आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला आज ऐतिहासिक यश मिळालं आहे.इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामांतर आणि इस्लामपूर नगरपरिषदेचे उरुण ईश्वरपूर नगरपरिषद असे करण्याचे जाहीर झाल्यानंतर ईश्वरपूर शहरात मोठा जल्लोष करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहराच्या नामांतरास केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ‘ईश्वरपूर’ हे नाव अधिकृतपणे मंजूर केले.
त्यानंतर नगरविकास विभागाने देखील इस्लामपूर नगरपरिषदेचे “उरुण ईश्वरपूर नगरपरिषद” असे नामकरण केल्याचे राजपत्र आज प्रसिद्ध करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल देशाचे गृहमंत्री मा. अमितभाई शहा, राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र जी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथ जी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील तसेच सदरची प्रक्रिया जलद गतीने केल्याबद्दल राज्य शासनातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार आमदार सदाभाऊ खोत यांनी मांडले.
दरम्यान, ईश्वरपूर शहरामध्ये उरूण ईश्वरपूर असे नामकरण झाल्यावर रॅली काढत फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटप करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी चौकात जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सतिश महाडिक, अमित ओसवाल, सुजित थोरात, सत्यवाण रासकर, अमोल ठाणेकर, गजानन फल्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
रयत क्रांती संघटनेकडून ईश्वरपुर नगरीमध्ये साखर वाटून जल्लोष करण्यात आला.
आमदार सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे ईश्वरपूर वासियांच्या वतीने त्रिवार अभिनंदन. गेली अनेक वर्षाची मागणी आज पूर्ण झाली असून इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर असे झाले. निश्चितच देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे अभिनंदन करतो. ४ महिन्यांमध्ये ५० वर्षाचा प्रश्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला. निश्चित मला माझ्या आयुष्यामध्ये एक ऐतिहासिक काम करता आलं याचा मला सार्थ अभिमान आहे.
राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी सांगली जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांची प्रतिक्रिया
केंद्र शासनाच्या ईश्वरपुर नामांतराच्या निर्णयानंतर राज्य शासनाने उरुण- इस्लामपुर शहराचे उरुण-ईश्वरपुर असे नामकरण केल्याने समस्त उरुण -ईश्वरपुर शहरवासियांच्या गेली अनेक दशकापासुन मागणीला न्याय मिळाला आहे.खर्या अर्थाने हा ऐतिहासिक निर्णय झाला असुन या निर्णयाचे मी शहर वासियांच्यावतीने स्वागत करतो.
या निर्णयासाठी आज पर्यत शहरातील अनेक नागरीकांनी पाठपुरावा केला, याचे विशेष अभिनंदन करतो,आजचा दिवस हा उरूण ईश्वरपुर शहर वासियांसाठी सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखा ठरला आहे.केंद्र व राज्य शासनातील महायुती सरकारचे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,एकनाथ शिंदे यांचे समस्त उरुण ईश्वरपुर शहरातील नागरीकांच्या वतीने अभिनंदन करतो व आभार मानतो.











































































