Last Updated on 14 Sep 2025 5:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
चहा हा भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. सकाळच्या ऊर्जेसाठी, ऑफिसमधील ब्रेकसाठी, मित्रांसोबत गप्पांसाठी किंवा थकलेल्या संध्याकाळीसाठी, चहाची एक कप-भर प्याली पुरेशी ठरते. मात्र, “चहात आधी काय टाकावं …दूध, साखर की चहा पावडर?” या प्रश्नावरून नेहमीच चर्चा रंगते.
योग्य क्रम असा आहे : पाणी उकळवून त्यात आधी चहा पत्ती, नंतर साखर आणि शेवटी दूध. यामुळे चहाचा अर्क नीट उमटतो, रंग खुलतो आणि साखर व्यवस्थित मिसळते.
घट्ट आणि कडक चहाची मागणी
आजच्या वेगवान जीवनशैलीत अनेकांना “कटिंग चहा”सारखा घट्ट आणि कडक चहा हवासा वाटतो. अशा चहासाठी पाण्यापेक्षा दूध जास्त वापरले जाते. चहा पत्ती नेहमीपेक्षा थोडी जास्त घालून तो ३-४ वेळा वर येईपर्यंत उकळला, तर गडद रंग व दमदार चव मिळते. कपात ओतल्यावर थोडावेळ झाकून ठेवल्यास सुगंध दुप्पट होतो.
कटिंग स्टाईल चहा : मुंबईची ओळख
मुलुखगिरी असो वा मुंबईचे रस्ते, कटिंग चहा ही सर्वांचीच पसंती. एका ग्लासात अर्धा चहा म्हणजेच “कटिंग” हा खास मुंबईकरांचा शोध मानला जातो. पाणी उकळल्यावर त्यात चहा पत्ती, आलं व वेलदोडा घालून उकळवणे, त्यानंतर दूध व साखर टाकून चहा वर येईपर्यंत उकळणे – हीच कटिंगची खासियत. लहान ग्लासातील दमदार घोट हीच त्याची खरी ओळख आहे.
घरगुती चहा मसाला पावडर
चहाच्या चवीला उठाव देणारा मसाला घरीच बनवता येतो. सुंठ, मिरी, वेलदोडे, दालचिनी, लवंग, जायफळ आणि ज्येष्ठमध भाजून बारीक पूड करून एअरटाईट डब्यात ठेवल्यास हा मसाला महिनोनमहिने टिकतो. चहात उकळताना फक्त चिमूटभर मसाला टाकला तरी चहा सुगंधी आणि रुचकर लागतो.
आरोग्यदायी मसाला : सर्दी-खोकल्यावर उतारा
चहाचा मसाला हा फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतो. सुंठ, मिरी, लवंग व दालचिनीमुळे शरीर उबदार राहते व कफ घटतो. तुळस व ओव्यामुळे श्वसनमार्ग स्वच्छ राहतात. ज्येष्ठमध घशाला आराम देते, तर जायफळ झोप सुधारते. अशा मसाल्याचा वापर करून चहा बनवला तर तो चविष्ट तर होतोच, पण औषधी गुणधर्मही देतो. गरज पडल्यास हा मसाला कोमट पाण्यात टाकून काढाही घेता येतो.
चहाची संस्कृती
साध्या चहापासून कटिंग, मसाला आणि औषधी काढ्यापर्यंतचा प्रवास हा भारतीय चहाप्रेमींच्या प्रयोगशीलतेचे दर्शन घडवतो. आज प्रत्येक घरात चहा बनवण्याची वेगळी पद्धत असते. कोणाला कडक आवडतो, कोणाला फिका, तर कोणाला मसालेदार. पण एक गोष्ट मात्र कायम – चहा हा केवळ पेय नसून तो गप्पा, मैत्री आणि आरामाचा साथीदार आहे.
साधा दैनंदिन चहा
साहित्य :
पाणी – १ कप
दूध – १ कप
चहा पत्ती – १ ½ चमचे
साखर – २ चमचे (चवीनुसार)
कृती :
एका पातेल्यात पाणी उकळा.
त्यात चहा पत्ती घाला.
उकळल्यावर साखर घाला.
आता दूध घालून चहा वर येईपर्यंत उकळा.
गाळून गरम सर्व्ह करा.
कडक/घट्ट चहा
साहित्य :
पाणी – ½ कप
दूध – १ ½ कप
चहा पत्ती – २ चमचे
साखर – ३ चमचे
कृती :
पाणी उकळून त्यात चहा पत्ती व साखर घाला.
मग दूध टाकून चहा ३–४ वेळा वर येईपर्यंत उकळा.
गाळून झाकण ठेवून १ मिनिट ठेवा आणि मग प्यावा.
कटिंग चहा (मुंबई स्टाईल)
साहित्य (२ कटिंगसाठी) :
पाणी – ½ कप
दूध – १ कप
चहा पत्ती – १ ½ चमचे
साखर – २ चमचे
आलं – ½ इंच (ठेचलेलं)
वेलदोडा – १
कृती :
पाणी उकळून त्यात आलं, वेलदोडा व चहा पत्ती घाला.
२ मिनिटं उकळल्यावर साखर व दूध घाला.
चहा वर येईपर्यंत उकळा.
गाळून लहान ग्लासात (कटिंग ग्लास) सर्व्ह करा.
घरगुती मसाला चहा
साहित्य :
पाणी – १ कप
दूध – १ कप
चहा पत्ती – १ ½ चमचे
साखर – २ चमचे
मसाला पावडर – ¼ चमचा (सुंठ, मिरी, वेलदोडा, दालचिनी, लवंग, जायफळ, ज्येष्ठमध यांची पूड)
कृती :
पाणी उकळून त्यात मसाला पावडर व चहा पत्ती घाला.
२ मिनिटं उकळल्यावर साखर व दूध घाला.
चहा २–३ वेळा वर येईपर्यंत उकळा.
गाळून गरम-गरम प्या.
५) औषधी मसाला चहा (सर्दी-खोकल्यासाठी)
साहित्य :
पाणी – १ कप
दूध – १ कप
चहा पत्ती – १ ½ चमचे
साखर – २ चमचे
औषधी मसाला – ¼ चमचा (सुंठ, काळी मिरी, लवंग, दालचिनी, वेलदोडा, तुळस, ओवा, ज्येष्ठमध, जायफळ यांची पूड)
कृती :
पाणी उकळा व त्यात औषधी मसाला टाका.
नंतर चहा पत्ती व साखर घालून २ मिनिटं उकळा.
दूध टाकून चहा वर येईपर्यंत उकळा.
गाळून प्यावा.
हा चहा सर्दी, खोकला, घसा दुखणे यावर फायदेशीर ठरतो.
चहा परफेक्ट करण्यासाठी टिप्स
पाणी नेहमी गाळलेले व ताजं वापरावं
दूध नेहमी उकळून थंड केलेलं असावं
चहा पत्ती उकळत्या पाण्यातच टाकावी
चहा उकळताना झाकण ठेवू नये
जास्त मसाला टाकल्यास चहा कडसर होतो









































































