२०१२ ची १२ मार्च ही तारीख. वेळ सायंकाळची. पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात एक मोठा शाही विवाह सोहळा संपन्न होत होता. गोरज मुहूर्तावर तो झाला, आणि वधुवरांना शुभेच्छा देण्यासाठी एकच झुंबड उडाली. केवळ कृष्णा – मांजरा काठचे, कराड – लातुरचाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील अफाट जनसमुदाय उपस्थित होता. त्यात मोठमोठ्या सेलिब्रिटीज् बरोबर महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्याचा भरणा लक्ष वेधून घेत होता. कारण दोन्ही घराणी मातब्बर होती, जनसामान्यांशी नाळ जोडलेली होती. रांगेने शुभेच्छा दिल्या जात होत्या. तिकडे निघालेला एक शेतकरी म्हणाला, ‘जोडा लक्ष्मी नारायणाचा आहे, मुलाच्या बाजूला उभे राहिलेले त्यांचे मोठे भाऊ का हो?’ हसू आवरल आणि उत्तरलो, ‘छे हो, ते त्यांचे वडील!’ विचारणारा बघतच राहिला… प्रसंग ओळखलाच असेल. सध्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि गौरवीताई देशमुख यांच्या लग्नाचा आणि त्यांच्या सोबत जे उभे होते ते डॉ. सुरेशबाबा. एका साध्या शेतकऱ्याकडून त्यांच्या लोभस आणि ताज्यातवान्या व्यक्तिमत्वाला मिळालेली ही मनमोकळी दाद! हेच तारुण्य आणि लोभासवाना ताजेपणा आजही त्यांच्या व्यक्तिमत्वात कायम आहे. १९५५ चा ३० मे हा त्यांचा जन्मदिवस. आज त्यांना ७० वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त या चुंबकीय आणि अजातशत्रू व्यक्तीमत्वाविषयी…
खरंतर वटवृक्षाच्या छायेखाली रोपटी कोमेजतात, त्यांची नीट वाढ होत नाही, ती खुंटतात, असं बोललं जातं; काही अंशी ते खरंही असल्याचं जाणवतं. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात अशी अनेक उदाहरणे आपण बघतो. पण कधीतरी काहीजण याला अपवाद ही असतात, त्यातीलच एक म्हणजे डॉ. सुरेशबाबा भोसले.
मच्छिंद्रनाथाच्या मुशीत आणि कृष्णेच्या कुशीत वसलेलं कराड तालुक्यामधील रेठरे बुद्रक हे गाव. इथले माधवराव मोहिते हे अत्यंत पुरोगामी, प्रागतिक विचारांचे शेतकरी. स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ. पाणी उपसायचे पहिले इंजिन १९१५ ला परिसरात त्यांनी आणले आणि तेव्हापासून या घराला ‘इंजिनवाल्यांचे घर’ तर तिकडे जाणाऱ्या रस्त्याला ‘इंजिन पाणंद’ म्हणून ओळखले जाऊ लागले. माधवरावांना तीन मुले. थोरले वसंतराव, मधले यशवंतराव आणि धाकटे जयवंतराव. पुढे वसंतराव शेतीत रमले, यशवंतराव राज्याच्या राजकारणात पडले. पुढे आमदार, खासदार, मंत्री झाले तर जयवंतरावांनी परिसराच्या उन्नतीच्या सहकार, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात आपला अवीट आणि दीर्घकालीन ठसा उमटवला. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेनंतर परिसरात सहकाराचे जाळेच निर्माण झाले आणि येथील अर्थकारणालाही वेग आला. पुढे या तिघांची ही मुले (म्हणजे माधवरावांचे नातू) अनुक्रमे मदनदादा (१९८९), डॉ. सुरेशबाबा (१९९९), आणि डॉ, इंद्रजीतबाबा (२००६) हे सुध्दा (ज्येष्ठताक्रमानुसार योगायोगाने) कारखान्याचे चेअरमन झाले. यातही डॉ. सुरेशबाबांची कारकीर्द सर्वात मोठी.
जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) आणि सौ. जयमाला (काकीसाहेब) यांचे मधले चिरंजीव म्हणजे डॉ. सुरेशबाबा. ३० मे १९५५ चा जन्म. त्यांचे शालेय व उच्च माध्यमिक शिक्षण विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे तर वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर शिक्षण मिरज येथे झाले. पुढे शिक्षण घेत असताना व पूर्ण करता करता इकडे कृष्णाकाठी आप्पासाहेबांच्या कार्याचा पसारा विस्तारत होता. त्यांना मदत म्हणून बाबा कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार सहकार व आरोग्य क्षेत्रात हळूहळू कार्यरत होवू लागले. अर्थात सहकार, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढे काम करणारा गुरु, साक्षात वडिलांच्या रुपाने घरातच होता. असं नशीब फार थोड्या जणांच्याच वाटणीला येते. बाबा त्याबाबतीत भाग्यवानच आहेत. पण गुरुकडून काय घ्यायचे, निवडायचे हे त्या शिष्यावर अवलंबून असते. मुर्ती घडते जरुर, पण त्यासाठी दगड सुध्दा टाकीचे घाव सोसणारा असावा लागतो ; मुरुमाच्या दगडातुन मुर्ती घडत नाहीत!
डॉ. सुरेशबाबांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील कामाची सुरुवात कृष्णा सहकारी बँकेपासून १९८३-८४ च्या आसपास केली. त्यातून ते समाज परिचित झाले. तो काळ म्हणजे विसाव्या शतकाचा संधीकाल आणि एकविसाव्या शतकाच्या चाहुलीचा. अनेक आव्हानांचा, तर स्थानिक पातळीवर महाराष्ट्रभर गाजलेल्या सहकारातील मोहिते भोसले घरांच्या पराकोटीच्या ऐतिहासिक संघर्षाचा, कटुतेचा. याच परिस्थितीत त्यांचे सार्वजनिक जीवनातील पदार्पण झाले. कृष्णेच्या निवडणुकांत सुरुवातीला अपयश आलं. काळ कसोटीचा होता. कारखाना नव्हता, परंतु तरीसुध्दा या घराची जिद्द आणि हिंमत बुलंद होती. कारखाना जरी गेला असला तरी त्यांच्याकडे असलेल्या अन्य संस्थाचा कारभार (विरोधकांनी आणलेल्या अडथळ्यांना दुर्लक्षित करत) सुरळीत सुरु होता. किबंहुना व्याप वाढतच होता. १९९९ ला कारखाना निवडणूक झाली सत्ता पुन्हा भोसले गटाकडे आली. आप्पासाहेब संचालक झाले तर बाबांकडे चेअरमन पदाची धुरा आली.
आप्पासाहेबांचे खंबीर मार्गदर्शन, आधार असला तरी देखील या नव्या चेअरमनच्या कसोटीचा हा काळ होता. कारण संपूर्ण सहकारी साखर कारखानदारीला याच काळात अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटाना तोंड द्यावे लागले. ऊसावरचा लोकरी मावा, त्यामुळे कमी उत्पादन, झोन बंदी उठल्यावर वाढलेली स्पर्धा आणि त्यामळे भविष्यकालीन अनिश्चितता आणि हे कमी की काय म्हणून साखरेचे कमालीचे गडगडलेले भाव, असा तो आव्हानात्मक काळ. यातून मार्ग काढायचा होता. आणि इथेच त्याचं नेतृत्व खऱ्या अर्थाने उजळून निघाले, असं म्हणावं लागेल. ‘When going gets though, the though gets going’ या उक्तीनुसार त्यांनी या संकटांचा समर्थपणे मुकाबला केला. साखर पोत्याच्या क्विटंल भावापेक्षा ऊसाला प्रतिटन जादा दर देणारे, भागविकास निधीचा थेट वाटा सभासदांपर्यंत पारदर्शकपणे पोहचविणारे, चेअरमन म्हणून ते ओळखले जाऊ लागले. आणि यातूनच त्यांची ‘संकटमोचक’ (Crises man) ही प्रतिमा तयार होऊ लागली. आणि या संकटांच्या काळातही त्यांनी आपली विकासदृष्टी सोडली नाही. कारखान्याच्या गाळप क्षमतेचे विस्तारीकरण केले, बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती केली. आजही तो व्यवस्थित सुरु आहे. कृष्णा कृषी महाविद्यालयाची मंजुरी आणि स्थापना हि सुद्धा याच काळात, हे सगळे श्रेय डॉ. सुरेशबाबांचे. ‘Management is doing the things right, leadership is doing the right things’ या उक्तीचा प्रत्यय आणि या दोन्ही गोष्टींचा सुरेख समन्वय बाबांच्या रुपाने परिसराने पाहिला.
पुन्हा सतांत्तर झाले. त्यानंतर सुमारे १० वर्ष बाबा आणि भोसले गट कारखान्याच्या कारभारापासून लांब राहिले. पण त्यांची कार्यकर्त्यांच्या संघटनेची बांधणी भक्कम तर होतीच उलट ती अधिकच बळकट होत गेली. या गटाचे एक वैशिष्ट्य राजकीय विश्लेषक नेहमी सांगतात, की पराभवाने खचून न जाता ते संकटांतही संधी शोधतात ! याचा प्रत्त्यय अनेक वेळा परिसराने घेतला आहे. सत्ता नसतानाही त्यांनी काही नवीन संस्था स्थापन केल्याच त्याचबरोबर इतर असलेल्या संस्थाही भरभराटीला आणल्या. सध्या तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट मानल्या जाणा-या जयवंत शुगर्सची स्थापना सर्वसाधारण याच दरम्यानची, या कारखान्यामुळे परिसरातील अतिरिक्त उसाच्या गाळपाची सोय तर झालीच पण एक उद्योग उभा राहिला, रोजगार निर्मिती झाली.अर्थकारणाला गती आली.
दरम्यान, वयोमान आणि प्रकृती आस्वास्थ्येमुळे आप्पासाहेब आता थकत चालले होते, त्यांनी हळूहळू कारभारातून लक्ष कमी करायला सुरुवात केली. आणि आपल्या आवडत्या लेखन, चिंतनात वेळ गुंतवू लागले. नकळतपणे कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख म्हणून बाबांकडे ही जबाबदारी आली. पसारा छोटा नव्हता आणि नाही. कृष्णा कारखाना, बँक, कृषी उद्योग संघ, मयुर पोल्ट्री, चॅरिटेबल ट्रस्ट, हॉस्पिटल, अभिमत विद्यापीठ, मेडिकल कॉलेज व अन्य वैद्यकीय महाविद्यालये, जयवंत शुगर्स, कृष्णा सरिता बझार, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, कृष्णा फौंडेशन, कामगार सोसायटी, पतसंस्था, ग्रामीण विश्वस्त संघ इत्यादी आणि अनेक संस्था, ही काही उदाहरणे. या सर्व संस्थांचा कारभार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बघत, वाढवत, आप्पांनी निर्मिलेल्या कार्यकर्त्यांची संघटना ही त्यांना न दुखवता जपण्याची आणि वृद्धिंगत करण्याची कसरत हसतमुखाने करणे, हे मोठेच कठीण काम होते. तेही बाबांनी सहजपणे केले. तीन पिढीतल्या कार्यकर्त्यांशी तितक्याच आपलेपणाने स्वतःला ऍडजेस्ट करून संवाद साधणे हे येरागबाळ्याचे कामच नोहे! त्यासाठी जातीचेच पाहिजे! अलीकडे त्यांचे दोन्ही सुपुत्र डॉ. अतुलबाबा व विनूबाबा यांची मदत त्यांना होतीय खरे, पण तरीही व्याप वाढतोच आहे ! वाढता वाढता वाढे!
डॉ. सुरेशबाबा यांच्या व्यक्तिमत्वाविषयी मला कायम एक कुतूहल वाटत आलेले आहे की, हा माणूस एवढा प्रचंड डोलारा सांभाळताना, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकत कसा नाही. एवढी ऊर्जा येते कुठून ? ते सतत उत्साही आणि हसतमुख असतात, त्यांना चिडताना रागवताना अगदी क्वचितच अपवादात्मक लोकांनी पाहिले असेल. या व्यापातून ते आपल्या आवडी निवडी, छंद, विरंगुळयासाठी वेळ कसा काढत असतील ? आपल्यातील ‘डॉक्टर’ जपण्यासाठी ते ठराविक दिवस कॅन्सरच्या शस्त्रकिया स्वतः करतात. कधी वाचन करतात, सायंकाळी बॅडमिंटन खेळत स्वतःला फिट ठेवतात हे सगळे करत असताना ते आपला खाजगीपणा ही जपतात. हे एक मिरॅकलच ! वास्तविक सार्वजानिक जीवनातील व्यक्तीला हे सहजासहजी शक्य नसते. तरीसुद्धा ते जमवतात. बाबांची सार्वजनिक सभारंभातील हसतमुख उपस्थिती एक प्रसन्नतेचा लोभस शिडकावा देऊन जातो!
भौतिक संपन्नतेचा लाभ वारसा हक्काने सर्वानांच मिळतो. पण विचार, गुणग्राहकता, संयम, ऊर्जा, नाविण्याचा ध्यास, उद्यमशिलता, दूरदृष्टी आणि कार्य (Vision and Mission), मनमोठेपणाचा वारसा मिळतोच, असे नाही. या गोष्टी आत्मसातच कराव्या लागतात, आणि अंगी बाणवाव्या लागतात. Virtues are to be cultivated ! आणि त्यासाठी मुळात अंतःकरणाची शुद्धता आणि निर्मळता महत्वाची असते, आणि बाबांकडे ती अपरंपार आणि जेनेटिक असल्याचे ठळकपणे जाणवते.
बाबा हे काही पूर्णवेळ राजकारणी नाहीत. किंबहुना ते फार कमी राजकारणी आहेत, जास्त समाजकारणी आहेत, पण सहकारात राजकारण कधी ना कधी चिकटतेच. निवडणुका असतात त्यानिमित्ताने भाषणे करावी लागतात. आपली बाजू मांडताना प्रसंगी प्रतिस्पर्ध्यावर टीका करावी लागते. पण त्यांची विरोधकांवरील टीकाटिपण्णी ही कधीच जिव्हारी लागणारी नसते. अत्यंत संयमी भाषेत सभ्यतेचे सर्व संकेत पाळतच ते बोलतात. अनावश्यक आक्रस्ताळेपणाला स्थान नाही. म्हणून तर त्यांच्यावर टीका करताना विरोधकही दहा वेळा विचार करतात. अन्यथा त्यांच्यावर असभ्य भाषेत केलेली टीका अंगावर येते! म्हणून तर ‘थोरो जंटलमन’ आणि ‘अजातशत्रू’ अशी राजकीय क्षेत्रातील दुर्मिळ विशेषणे त्यांच्याबाबत वापरली जातात. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. ४ वर्षांपूर्वी झालेल्या कृष्णा कारखान्याचा निवडणुकीत त्यांनी जो विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला त्यामध्ये त्यांच्या या प्रतिमेचा (सच्चा माणूस !) मोठाच वाटा होता. एकतर ते शब्द कमी देतात आणि दिला तर हमकास पाळतात, ही त्यांची ख्याती!
त्यांना वेगवेगळ्या प्रसंगी कराव्या लागणाऱ्या भाषणांच्या विषयांची रेंज खूप मोठी आहे. त्यातून त्यांचा अभ्यास व सखोल ज्ञान दिसते. अभिमत विद्यापीठाच्या कार्यक्रमात शिक्षण, हॉस्पिटलच्या कार्यक्रमात आरोग्य, अन्य संस्थांच्या कार्यक्रमात अर्थ आणि विकास तर स्थानिक स्वराज संस्थात धोरण आणि व्यक्तिगत कार्यक्रमात व्यक्तीविशेष गुणगौरवपर, समयोचित भाषणे करावी लागतात, आणि कोणतेही टिप्पण हातात न घेता अस्खलितपणे ते काही ना काही नवा आणि सकारात्मक विचार समाजाला देतात. हे त्यांचे वैशिष्ट्य! त्या त्या क्षेत्रातील आव्हानांची वस्तुस्थिती, आशेचे किरण आणि नव्या संधी ते समाजाला परिचित करून देतात. काही वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या एका दीक्षांत समारंभात बोलताना बाबांनी (राज्यपाल राम नाईक साहेब पाहुणे होते) एक विचार मांडला होता. ”आपल्याला जर पुढे जायचे असेल तर आपली शिक्षण पद्धती काळाबरोबरच नव्हे तर काळाच्या पुढे एक पाऊल असायला हवी!” किती प्रेरणादायी विचार! आणि याच विचाराने त्यांच्या शिक्षण संस्थांची वाटचाल सुरु असल्याचे दिसते. अव्वलतेचा ध्यास प्रत्येक ठिकाणी असतोच.
सार्वजनिक जीवनातील ४२ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांच्या योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळालेत. मिळत आहेत आणि यापुढेही मिळतील. नुकताच मिळालेला गोडबोले ट्रस्टचा ‘सातारा भूषण ‘, नेर्लेकर ट्रस्टचा, ‘धन्वंतरी पुरस्कार ‘, कराडच्या कालिकादेवी ग्रुपचा पुरस्कार तर काही दैनिकांचे उद्योजकता आणि समाजसेवेसाठी मिळालेले पुरस्कार ही काही ठळक उदाहरणे. त्याचबरोबर लोकांचे प्रेम आणि दुवा हाच खरा पुरस्कार ते मानतात. सत्ता असो वा नसो ‘सेवा’ हा या घराचा, कुटुंबाचा स्थायी स्वभाव विशेष आहे. म्हणून तर दोन तीन तालुक्यातील लोकांची सर्वाधिक गर्दी यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात नेहमीच ओसंडून वाहत असते. मोठ्या आशा व अपेक्षेने लोक त्यांच्याकडे येतात, आणि तेही बहुदा सकारात्मक फळ घेऊन जातात. शेवटी लोक आंब्याच्याच झाडांना दगड मारतात, बाभळींना नाही!
डॉ. बाबा आणि भोसले कुटुंबाच्या प्रत्येक उद्योगातून शेकडो, हजारो, रोजगार उपलब्ध झाले. अनुषंगिक सेवांच्या रूपाने स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावले पण या कामाची राजकीय फलिते त्याप्रमाणात त्यांना मिळाली नाहीत किंवा उशिराने मिळाली; हे ही जाणवतं. खरंतर पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात या कुटुंबाइतकी मोठी कामे फार क्वचित ठिकाणी झालेली आहेत. पण राजकीय फलित न मिळाल्याची खंत त्यांच्या वागण्या बोलण्यातून कधीच जाणवत नाही. सुडबुद्धी हा शब्द त्यांच्या कोषात नाही. त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांची पोरंही डॉक्टर, नर्सेस केली. कोरोना काळात तर कृष्णा हॉस्पिटलचे काम देशभरात नावाजले गेले. पण या हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेल्या कामाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून कधीच झाला नाही. कोरोनापूर्वी सहाएक वर्षांपूर्वीचा एक प्रसंग अजूनही आठवतो. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अतुलबाबांचा पराभव झाला होता. काही कार्यकर्ते भेटायला घरी गेलो होतो. डॉ. सुरेशबाबा भेटले, सर्वांच्याच दुःख आणि रागाच्या भावना तीव्र होत्या. त्याभरात बोलून गेलो. ‘ बाबा, हॉस्पिटलच्या पेशंटना बिल कपात. बिल माफी देता. ते लाड आता बंद करा. ज्यांच्यावर उपचार केले त्यांनी जरी मते दिली असती तरी अतुलबाबा सहज निवडून आले असते.’ बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलेले आणि काहीशा घुश्यातच ते म्हणाले, ‘पुन्हा असे बोलू नका, आपण हॉस्पिटल लोकांचे सेवा करण्यासाठी काढले आहे. आणि चालवतोय, लोकांचे आरोग्य महत्त्वाचे त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही आणि यापुढेही जोडायचा नाही. हॉस्पिटलचा उपयोग त्यासाठी होणारही नाही. आपण आपले काम करत रहायचे एवढंच !’ ‘सेवा’ हाच स्वभावविशेष सिद्ध करणाऱ्या अनेकांपैकी हा एक प्रातिनिधिक प्रसंग!. दुसरा प्रसंग कोल्हापूर जवळच्या उचगावला अपंगांसाठी कार्य करणारी एक मोठी संस्था आहे. त्या संस्थेच्या कार्यक्रमाला बाबा पाहुणे होते. बाबा त्या अपंग मुला-मुलींत एवढे रमले कि दिलेल्या वेळेपेक्षा दोनएक तास जास्तच त्यांच्या सहवासात रेंगाळले. त्यांच्याशी संवाद साधला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मदतीचा शब्द ही दिला! ही सुहृदयता, ओलावा येतो कुठून?
या कुटुंबाच्या माध्यमातून या परिसरात कृषी, औद्योगिक, आरोग्य, सहकार क्षेत्राशी संबंधी आंत्रप्रणरशिप आणि त्यातून साकारलेली छोटी का होईना, परंतु ‘कल्याणकारी’ अर्थव्यवस्था जन्माला आली, हे नाकारता येत नाही. आणि यामध्ये बाबा, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी यांचे योगदान मोलाचे आहे. कुटुंबियांचा उल्लेख आल्यावर, त्यांच्या दोन मुले डॉ.अतुलबाबा आणि विनायकबाबा यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. हे दोघेही बाबांचा भार बराचसा हलका करतात. हे दोघे उद्या आपल्या कर्तृत्वाने राजकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रात खूपच मोठी भरारी घेतील, अशी खात्री लोकांना वाटते. त्याचबरोबर ‘Behind the success of every man is a woman’ असे म्हटले जाते. सौ. उत्तरावहिनी मोठ्या बाबांना साथ देताना संघर्षाच्या काळात त्यांच्यामागे सावलीसारख्या ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी घरची आघाडी तर समर्थपणे संभाळलीच, त्याचबरोबर त्यांचा विशेषतः महिलांशी असलेला जनसंपर्क या कुटुंबाशी वेळोवेळी महत्वाचा ठरला. आजही त्या महिला मेळावा, हळदीकुंकू किंवा अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून परिसरातील अनेक परिवारांशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे, घरगुती संबंध टिकवून आहेत. राजकीय धकाधकीच्या वातावरणातही त्यांनी आपलं ‘घरपण’ जपलं. मुलांवरच्या संस्कारात कमी पडल्या नाहीत. हे कर्तव्य संभाळातच त्या कृष्णा सरिता बझार चा कारभार पाहतात, तर सौ. गौरवीताईंना माहेरचा मोठाच राजकीय वारसा लाभला आहे, त्याचा प्रत्यय त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिला आहे! म्हणूनच कुटुंबवत्सल बाबांच्या आत्तापर्यंतच्या यशस्वी वाटचालीत या सदस्यांचे योगदान महत्त्वाचे आहे!!
बाबांचे व्यक्तिमत्व, त्यांचे कार्य, त्यांनी दाखवलेली दिशा, एका लेखाच्या शब्द मर्यादेत बसविणे खूप अवघड आणि आव्हानात्मक आहे. पण एक विशेष म्हणजे त्यासाठी उसना किंवा खोटा अभिनिवेश आणावा लागत नाही. आज ते वयाची सत्तरी पूर्ण करताहेत. त्यांच्या वाटचालीसाठी ७० हा फक्त एक अंक किंवा स्वल्पविराम आहे. असेच म्हणावं लागेल. कारण अजून बराच पल्ला गाठायचा आहे. रेठरे झाले, नंतर कराड त्यानंतर धावरवाडी झाली. आणि आता त्यांना आता शिरवळ खुणावतयं. अशी उद्योगी माणसं किनाऱ्यावर कधी समाधान मानत नाहीत, तर मुशाफिरीसाठी सागरालाच, ‘किनारा तुला पामराला’ असं आव्हान देत असतात. आइनस्टाईन म्हणतो, ‘Life is like riding a bicycle, to keep your balance you must keep moving’. बाबांच्या कारकीर्दीच वर्णन आणि सार या एका वाक्यात आलय असं वाटतं. त्यांच्या आजोबांनी विकासाची ‘पाणंद’ निर्माण केली; चुलते – वडिलांनी पक्का रस्ता बनवला बाबांच्या पिढीने त्याचा हायवे केला. आता पुढच्या पिढीने विकासाच्या लेन्स वाढवून फ्लायओव्हर करावा याच त्यांच्या अपेक्षा असणार हे निश्चित. आणि ही अपेक्षा पूर्तीची कृतार्थता त्यांना लवकरच मिळेल ही खात्री आहे. कारण नियतीला निश्चय आणि निग्रहांची साथ मिळाली की निर्मिती होतेच होते! आणि तो एव्हरग्रीन आनंद एव्हरग्रीन बाबांना उदंड आणि अखंडपणे मिळत राहो याच जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!

राजेंद्र मोहिते,
रेठरे बुद्रुक
7350038910