कोल्हापूर | परदेशातील QS (Quacqurelli Symonds) रँकिंगच्या पहिल्या 200 संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदवीका तसेच पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या किंवा प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्याची योजना शासनातर्फे राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी दि. 25 एप्रिल 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 17 मे 2025 अशी होती. योजनेस मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवून दि. 6 जून 2025 पर्यंत करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.
योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे-
विद्यार्थी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
विद्यार्थ्यांच्या कुटूंबाचे वर्षिक उत्पन्न 8.00 लाखापेक्षा जास्त नसावे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडी साठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल.
विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सन 2024-25 चे एकत्रित वर्षिक उत्पन्न रु. 8.00 लाखापेक्षा जास्त नसावे
विवाहित महिला उमेदवारासाठी पतीकडील कुटूंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दाखविणे आवश्यक आहे.
जर अर्जदार स्वतः किंवा अर्जदारांचे आईवडील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत, पती पत्नीपासून विभक्त राहत असल्यास कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
महिला उमेदवार विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत, किंवा पती पासून विभक्त असल्यास जर वडीलांकडे वास्तव्यास असेल तर बडीलांकडील एकत्रित वार्षिक उत्पन्न दाखविणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागे पैकी 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव असतील.
परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, द्वित्तीय, तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल परंतु द्वितीय, व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पूर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती अनुज्ञेय असणार नाही.
एका कुटूंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही.
यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल, एक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत एका कुटूंबातील दोन पाल्यांचा समावेश असल्यास प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरीत जागा रिक्त राहिल्यास एका कुटुंबातील दुसऱ्या पाल्यांस लाभ देण्यात येईल. तसेच शिष्यवृत्ती एकाच वेळेस मान्य करण्यात येईल. एका पेक्षा जास्त वेळेस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही.
भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांमधुन पदव्युत्तर पदवी किवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS World University Rank )200 च्या आत असावी, (सन 2025 ची QS Ranking)
इच्छुक विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in किंवा https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 06 जून 2025 रोजी समक्ष किंवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम.एच.बी. कॉलनी, म्हाडा कमर्शियल कॉम्प्लेक्स समता नगर, येरवडा, पुणे 411006 येथे दोन प्रतीत सादर करावा, असे आवाहन श्रीमती नेर्लीकर यांनी पत्रकाव्दारे केले आहे.