सांगली । माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली देशातील अग्रगण्य बँक म्हणून वाटचाल करीत असणाऱ्या पेठ (ता.वाळवा) येथील राजारामबापू सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विजयराव विठ्ठलराव यादव (बावची) यांची, तर उपाध्यक्षपदी माणिकराव शामराव पाटील (बोरगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनिबंधक संभाजी पाटील हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यांनी नूतन अध्यक्ष- उपाध्यक्षांचा सत्कार केला.
मावळते अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी सत्कार केला. माजी मंत्री आ.जयंत पाटील,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते प्रतीक पाटील यांनी नूतन अध्यक्ष- उपाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्ष- उपाध्यक्ष यांनी संचालक मंडळ व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यासमवेत कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राजारामबापू सहकारी बँकेच्या सभागृहात बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत जेष्ठ संचालक डॉ.प्रकाश पाटील यांनी अध्यक्ष पदासाठी विजयराव यादव यांचे नांव सुचविले, त्यास संचालक धनाजी पाटील यांनी अनुमोदन दिले. तर संचालक सुभाषराव सुर्यवंशी यांनी उपाध्यक्ष पदासाठी माणिकराव पाटील यांचे नांव सुचविले, त्यास संचालक आनंदराव लकेसर यांनी अनुमोदन दिले. यावेळी दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,प्राचार्य आर.डी.सावंत,नेर्ले गांवचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,प्रदेश सदस्या कमल पाटील यांच्यासह बँकेचे संचालक,तसेच तालुक्या तील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी नूतन-उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या.
विजयराव यादव व माणिकराव पाटील यांनी माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी बँकेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष म्हणून संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लोकनेते राजारामबापू पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत सर्व सामान्य माणसाला आर्थिक ताकद देत संस्थे च्या प्रगतीमध्ये निश्चित योगदान करू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी मावळते अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांनी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बाबर यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात बँकेच्या वाटचालीचा वाढवा मांडला. संचालक व नेर्ले गांवचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील यांनी आभार मानले.