मुंबई । पुणे येथील मंगेशकर रुग्णालयात उपचारांअभावी गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारला खडबडून जाग आली असून राज्याच्या विधी व न्याय विभागाने धर्मादाय रुग्णालयात रुग्णाकडून डिपॉझीट घेण्यावर निर्बंध आणले आहेत. अनामत रकमेसाठी उपचार नाकारले तर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीमधील उपचारांमध्ये गर्भवतींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी गर्भवतीकडून अनामत रकमेची मागणी करण्यात आली होती. अनामत रक्कम न भरल्यामुळे या महिलेवर उपचार झाले नाहीत. त्यात या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात खळबळ माजली. त्यानंतर राज्य सरकारने पुण्यातील धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी विधी व न्याय विभागाने धर्मादाय रुग्णालयांना आदेश जारी केले आहेत.
खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत
१) मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंजूर करण्यात आलेल्या निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठीच्या धर्मादाय रुग्णालय योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता सर्व धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय आयुक्तांनी सूचना द्याव्यात.
२) निर्धन रुग्ण निधी (IPF) शिल्लक नसल्याच्या कारणामुळे रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी आरोग्याशी संबंधित जसे की, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम इत्यादी व अन्य सर्व आरोग्याशी संबंधीत योजना लागू कराव्यात.
३) धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी नियोजित उपचार/शस्त्रक्रिया याकरीता उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे मंत्रालयातील ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची” पूर्वमान्यता घ्यावी. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थीतीमध्ये या योजनेअंतर्गत धर्मादाय रुग्णालयांनी प्रथम संबंधीत रुग्ण तातडीने भरती करुन घेवून त्यावर उपचार करावेत व त्याबाबत ऑनलाईन प्रणालीवर नोंद घेवून पुढील ४८ तासात प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रालयातील धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये ऑनलाईन प्रणालीमध्ये कार्योत्तर मंजूरीसाठी पाठवावा.
४) निर्धन रुग्ण निधी (IPF) खात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेवून ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत करण्यात यावी.
५) धर्मादाय रुग्णालयाने कोणत्याही रुग्णाकडून अवाजवी पद्धतीने अनामत रक्कम स्विकारण्यावर निर्बंध टाकण्यात येत आहेत. यापुढे अनामत रकमेअभावी धर्मादाय रुग्णालयामध्ये कुठल्याही रुग्णास उपचार नाकारले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.
६) सर्व धर्मादाय रुग्णालयामध्ये कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमधील रुग्णांवर प्राथम्याने उपचार करण्यात यावेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये गर्भवती महिलांवरील उपचाराचाही समावेश करण्यात येत आहे.
७) धर्मादाय रुग्णालयातील निर्धन व दुर्बल घटकामधील रुग्णांवर उपचाराकरीता मा. उच्च न्यायालयाने निर्देशीत केलेल्या योजनेअंतर्गत मा. उच्च न्यायालय किंवा शासनाने वेळोवेळी निर्देशीत केलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य कागदपत्रांची मागणी करण्यावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात येत आहेत.
८) अनेक धर्मादाय रुग्णांलयांनी रुग्णालयाच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत फार्मसी, रोगनिदान चाचण्या (उदा. पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी इ.) या बाहयस्रोतांकडे हस्तांतरीत केलेला आहे. यामुळे रुग्णालयाचे एकूण महसूली उत्पन्न कमी होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम आयपीएफ निधीमध्ये जमा होणारी रक्कम कमी होण्यावर होतो. त्यामुळे अशा सुविधा जरी धर्मादाय रुग्णालयाने बाहयस्रोतांकडे हस्तांतरीत केलेल्या असल्या तरी अशा बाहयस्रोतांकडे हस्तांतरीत सुविधांचे जे एकूण महसूली उत्पन्न दरवर्षी तयार होते त्याच्या दोन टक्के रक्कम आयपीएफ निधीमध्ये वर्ग करण्यात यावेत.