मुंबई | प्रतिनिधी
हॉटेल, सुपरमार्केट, आयस्क्रीम पार्लर किंवा किराणा दुकान… कुठेही खरेदी करताना तुम्ही दिलेल्या बिलाची नीट तपासणी करता का? नाही? मग सावधान! बिल व्यवस्थित तपासण्याची गरज आहे. अलीकडे बेरजेत फेरफार करून काही ठिकाणी ग्राहकांकडून अधिक पैसे उकळले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत.
बरेच ग्राहक गडबडीत असतात आणि बिलात दिलेले आकडे नीट तपासत नाहीत. हाच गैरफायदा काही दुकानदार, हॉटेल, सुपरमार्केट आणि फूड स्टोअर्स घेतात.
काही ठिकाणी बेरजेत हलकीशी फेरफार करून एकूण रक्कम वाढवली जाते. उदा. ₹250 + ₹150 + ₹100 यांची बेरीज ₹500 एवढीच होईल, पण काही वेळा ती ₹520 किंवा ₹530 दाखवली जाते. ग्राहक घाईत असल्याने ते हे सहज लक्षात घेत नाहीत.
जर एखाद्या जागरूक ग्राहकाने ही चूक लक्षात आणून दिली, तर संबंधित दुकानदार ‘चूक झाली,’ ‘सिस्टिमची गडबड आहे,’ ‘अक्षरशः 2-5 रुपयेच आहेत’ असे म्हणत सारवासारव करतात. काही वेळा मुद्दाम जादा पैसे घेतले जातात आणि ग्राहकांनी पकडल्यावर सॉरी म्हणून सुटका करून घेतली जाते.
तुम्ही या प्रकाराला बळी तर पडत नाही ना?
✅ बिलवरील आकडे जुळवून पहा – प्रत्येक वस्तूची किंमत योग्य आहे का?
✅ टॅक्स योग्य प्रमाणात लावला आहे का? अनावश्यक शुल्क तर जोडले नाही ना?
✅ सर्व्हिस चार्ज सक्तीने लावला गेला आहे का? (तो ऐच्छिक असतो!)
✅ डिजिटल आणि प्रिंटेड बिलात काही फरक आहे का?
ग्राहक काय करू शकतात?
🚨 बिल देताना गडबड करू नका, प्रत्येक रक्कम व्यवस्थित तपासा.
🚨 अनावश्यक शुल्क असेल, तर दुकान किंवा हॉटेल व्यवस्थापनाला लगेच कळवा.
🚨 फसवणुकीची तक्रार ‘राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन 1915’ वर करा किंवा ‘consumerhelpline.gov.in’ वर ऑनलाइन तक्रार करा.
ग्राहकांनी मूकसंमती न देता या प्रकारांना वाचा फोडणे गरजेचे!
✅ अशा दुकानांची माहिती मित्रमंडळींना द्या, सावध करा.
✅ सोशल मीडियावर हे प्रकरण शेअर करा, जेणेकरून इतर ग्राहकही जागरूक होतील.
✅ बिल देताना प्रत्येक रकमेची पडताळणी करा आणि जादा शुल्क आढळल्यास लगेच आक्षेप घ्या.
✅ जर वारंवार फसवणूक होत असेल, तर ग्राहक तक्रार नोंदणी क्रमांक (1915) किंवा ‘consumerhelpline.gov.in’ वर तक्रार करा.
जागृत व्हा – तुमचे पैसे वाया जाऊ देऊ नका!
ग्राहकांच्या अनास्थेमुळे अनेक ठिकाणी अशा फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. आपणच सजग राहून आपला आणि इतरांचा बचाव करू शकतो. म्हणूनच, बिल नीट तपासा आणि कुठेही गंडा बसत असेल तर त्याचा जाहीरपणे विरोध करा!