फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका व्हायरल!
मुंबई । महायुती सरकारचा शपधविधी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची शासकीय कार्यक्रम पत्रिका समोर आली. या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव लिहिण्यात आले आहे.
काय लिहिलंय निमंत्रण पत्रिकेत ?
दरम्यान, या शपथविधीची निमंत्रण पत्रिका समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. यावर लिहिलं आहे की देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ गुरुवारी, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजता आझाद मैदान, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी आपण कृपया उपस्थित रहावे, ही विनंती. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी ही निमंत्रण पत्रिका जारी केली आहे.
हेही वाचा – महायुतीने अखेर केला सत्ता स्थापनेचा दावा
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानात महायुतीच्या नेत्यांचा शपथविधी पार पडेल.
देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ उद्या, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आझाद मैदान, मुंबई येथे होणार आहे.
महायुतीचे विधानसभेतील संख्याबळ २३७ वर
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० जागा मिळाल्या आहेत. तसेच इतर ७ आमदारांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने महायुतीचे विधानसभेतील संख्याबळ २३७ वर पोहोचले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२, शिंदेंची शिवसेना ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागांवर विजय मिळवला.