आष्टा येथे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
सांगली । आ. जयंत पाटील यांना ३५ वर्षात मतदार संघाचा चौफेर विकास साधता आला असता. परंतु त्यांनी आपलेला मिळालेल्या पदाचा व सत्तेचा वापर फक्त त्यांना राजकारणात ओव्हरटेक करणाऱ्यांची जिरवा-जीरावी करण्यासाठी, त्यांना राजकारणातून कायमचे संपवण्यासाठी व दुसर्याच्या संस्था लुटण्यासाठी केला. आजपर्यंत ते फक्त गलिच्छ राजकारण करत आले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ज्यांना ऊसाला योग्य दर देता येत नाही अशांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहू नयेत असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
आष्टा येथे इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खा. धैर्यशील माने, आनंदराव पवार, प्रभाकर जगदाळे, पृथ्वीराज पवार, सी.बी.पाटील, राहुल महाडिक, गौरव नायकवडी, प्रसाद पाटील, भीमराव माने, केदार पाटील, अशोक पराडकर, सागर खोत, सागर मलगुंडे, विक्रम पाटील, प्रवीण माने, दत्तात्रय पाटील प्रमुख उपस्थित होते.
ना.अजित पवार म्हणाले, स्व. विलासराव शिंदे यांच्या बरोबर मी काम केले आहे. त्यांनी या भागाचा विकास केला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून पुढे जात आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही कमी पडलो. आता आमच्या चुका आम्ही सुधारल्या आहेत. शेतकरी हा माझ्या देशाचा कणा आहे. तो आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही पाऊले उचलली. येथील लोकप्रतिनिधीना ३५ वर्षे तुम्ही निवडून दिले. पण त्यांना येथे एमआयडीसी उभारता आली नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता आला नाही. इस्लामपूर व आष्टा बसस्थानकाची काय अवस्था आहे हि मी सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला तालुक्यातील महापुरुषांची स्मारके करता आली नाहीत. रिकव्हरी प्रमाणे दर द्यायचा झाला तर ३८०० रुपये टनाला येथील शेतकर्याला मिळायला पाहिजेत, दिवाळी सर्वांना सोबत घेऊन गोडधोड करायची असते. स्वतःच करून खायची नसते. तुम्हाला साधी मतदार संघातील लोकांची दिवाळी साजरी करता येत नाही आणि तुम्ही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघता. ऊस दर देण्यात स्पर्धा असावी. व्यक्तिगत स्वार्थ साधणारी स्पर्धा नसावी. तुम्ही जलसंपदा मंत्री होता. तुमच्या मतदार संघातून नदी गेली आहे. तरीही तुम्हाला जनतेला पाणी देता आलं नाही, हे येथील लोकांचे दुर्देव आहे. मतदार संघाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी खमक्या असावा लागतो. निशिकांतदादांना या निवडणुकीत निवडून द्या. आम्ही पहिले स्व.विलासराव शिंदे साहेबांचे स्वप्न असणारी भुयारी गटर योजना मार्गी लावून आरोग्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकू. एमआयडीसीची निर्मिती करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ. बारामतीपेक्षा चांगला विकास करण्यासाठी निधीची कमरतात पडू देणार नाही. इस्लामपूर मतदार संघाचा चेहरा मोहरा बदला नाहीतर पवार नाव सांगणार नाही.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, येथे एका नेत्याच्या विरोधामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा राहिला नाही. १९७८ ला स्व.राजारामबापू पाटील यांच्या पराभवामुळे हे शहर विकासापासून जाणून बुजून वंचित ठेवले गेले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही आण्णा भाऊ साठे व स्व.विलासराव शिंदे यांचा पुतळा बसवण्यासाठी मी पाठपुरावा करेन. स्व.शिंदेसाहेब यांनी हा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी संघर्ष संपवला. पण विरोधकांनी त्यांना शेवटपर्यंत त्रास देण्याचा प्रयत्न केला. आता निवडणुकीतील पोम्प्लेटवरून ही त्यांचा फोटो यांनी गायब केला. त्यांच्या घरातही त्यांनी वाद लावले. आष्टा शहराच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून १०२ कोटींचा निधी दिला. आगामी काळात घरकुल धारकांना पोपर्टी कार्ड काढून देऊ. सीटी सर्व्हे नंबर ४,६, ९ चा प्रश्न व क्षारपड जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करू. वैभव व विशाल शिंदे यांना कधी अंतर देणार नाही, हे यानिमित्ताने मी तुम्हाला अभिवचन असेल.
हेही वाचा – जयंत पाटील यांची दडपशाही मोडून काढणार; विरोधकांनी उचलला विडा
राहुल महाडिक म्हणाले, लय जणांना वाटत होतं याचं विस्कटणार. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे बंडखोरी करण्यासाठी फोन येत होते. ही सभा निशिकांतदादांच्या विजयाची सभा आहे. १९७८ ची पुनरावृत्ती आता करायची आहे. कोणीही गाफील राहू नका. परिवर्तन घडवा.
गौरव नायकवडी म्हणाले, एकास एक लढतीमुळे विरोधकांची पळता भुई सुरू झाली आहे. जयवंतरावाना सोयीस्कर होईल असे राजकारण आमच्याकडून कधी झाले नाही. जे आजपर्यंत कधी घडलं न्हवत ते या निवडणुकीत घडले. त्यामुळे यंदा परिवर्तन नक्की आहे.
भीमराव माने म्हणाले, आष्टा येथील जनता स्वाभिमानी आहे. ती कधी अन्याय सहन करत नाही. विलासराव शिंदे साहेबांना जो त्रास झाला, त्याचा बदला घेतल्याशिवाय येथील जनता आता राहणार नाही.
यावेळी अशोक खोत, सागर मलगुंडे, सतीश बापट, वीर कुदळे, सनी खराडे, तैसीन आत्तार, सुरेखा जगताप, आशाताई पवार, सुनीता काळे, निवास पाटील, धैर्यशील मोरे, संजय बेले, मधुकर हुबाले, संदीप सावंत, रणजित माने, चंद्रकांत पाटील, दादासाहेब रसाळ, राहुल पाटील, अक्षय पाटील, अजित पाटील, विश्वजीत पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी दोन नद्यांचे पाणी चाखलेला माणूस…
येथील विद्यमान आमदार सर्वांना मी तुम्हाला वाळव्याचे पाणी दाखवतो, असे म्हणत आजपर्यंत भीती घालत आले. पण मी कृष्णा व वारणा या दोन्ही नदीचे पाणी चाखलेला माणूस आहे. आजपर्यंत या ओढ्याच्या पाण्याने आपल्या सर्वांचे आरोग्य बिघडवले. गेली अनेक वर्षे हे पाणी थांबत न्हवत. पण आता एकास एक लढतीमुळे या पाण्याला आपण बांध घातला आहे. आता परिवर्तन घडवून तुम्ही त्यांना पाणी दाखवून द्या, असे आवाहन यावेळी पृथ्वीराज पवार यांनी केले.
काट्याने काटा काढल्यावर तुमच्याजवळ माणसे कशी राहणार…
इस्लामपूरच्या माजी नगरसेवक मनीषा पाटील, सुरज पाटील, संजय कोरे, दिनेश शहा, मानसिंग पाटील, संजय तेवरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यावर बोलताना ना.अजित पवार म्हणाले, २०१७ ला जि.प.निवडणूकीत वैभव शिंदे यांच्या विरोधात त्यांनी अपक्ष उमेदवार उभा केला. पक्षाने दिलेला उमेदवार यांनी पडला. इस्लामपुरात स्व.पै.चंद्रकांत पाटील यांना पाडले हे असे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा काट्याने काटा काढायला लागल्यावर तुमचे तुमच्याजवळ माणसे कशी राहणार, असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हे निघाले राज्याचे नेतृत्व करायला…
आ.जयंत पाटील यांना त्याच्या मूळ गाव कासेगाव येथे पोलिस ठाण्याची इमारत उभी करता आली नाही. ते पोलिस ठाणे आज ही भाड्याच्या इमारतीत आहे. पोलिस बांधवानची निवासस्थानाचा प्रश्न तर तुम्ही सोडाच. आणि म्हणे हे राज्याचे नेतृव करायला निघाले आहेत. कशाला का सगळी पोलिस ठाणी भाड्याच्या घरात करायची आहेत यांना. येथे चांगले रस्ते नसल्याने अनेक जणांनी जीव गमवावे लागले. सूतगिरणी सुद्धा तुम्ही बंद पडल्या. तुमची नातीगोती चांगली आहेत. पाहुण्यांना सांगून एखादी कंपनी मतदार संघात निर्माण करून तरुणांना रोजगार तुम्हाला देता आला असता, असा टोलाही ना.अजित पवार यांनी जयंत पाटील यांना लगावला.